तक्रारदार महिलेचा वैद्यकीय तपासणीसाठी नकार
पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह: नवनवीन अडथळे निर्माण झाल्याने तपासकामात गुंतागुंत
पणजी : कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणाच्या तपासात नवनवीन अडथळे निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एका 19 वर्षीय तक्रारदार महिलेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याने नवीन धक्का बसला आहे, असे अधिकाऱ्यानी सांगितले. तिने हा नकार दिल्याने तिच्या तक्रारीत संशयित सोहम नाईक याच्या विरोधात केलेल्या आरोपांचा तपास करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, जुलै 2025 ते मार्च 2026 दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिने सोहम नाईकवर तिच्या संमतीशिवाय तिची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केल्याचाही आरोप केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, हे कथित अत्याचार केपे धबधब्याजवळील ठिकाणासह अनेक ठिकाणी घडले आहेत. वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याने तपासकामात गुंतागुंत निर्माण झाली आहे.
जेव्हा तपास पथक साक्षीदारांच्या जबानीची फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुराव्यांसह पडताळणी करण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा प्रकरणाच्या पुराव्याचा पाया कमकुवत होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले. या घडामोडींमुळे नाईकविऊद्ध नोंदवलेल्या पाच प्रथम माहिती अहवालांचा (एफआयआर) समावेश असलेल्या एकूण तपासातील वाढत्या आव्हानांमध्ये भर पडली आहे.
यापूर्वीच्या एका धक्क्यात, पहिल्या एफआयआरमधील तक्रारदार महिला कथितरित्या बेपत्ता आहे, ज्यामुळे तिचा जबाब औपचारिकपणे नोंदवण्याच्या प्रयत्नांना विलंब होत आहे. बेपत्ता झालेल्या तक्रारदार महिलेने यापूर्वी ईमेलद्वारे गोवा पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यासोबत तिने काही छायाचित्रे जोडली होती, जी तिच्या आरोपानुसार आरोपींनी तिला धमकावण्यासाठी आणि तिच्यावर दबाव आणण्यासाठी वापरलेली अश्लील छायाचित्रे होती. ही छायाचित्रे देखील तिच्या संमतीशिवाय ऑनलाइन पोस्ट करण्यात आली होती, असा आरोप आहे.