तक्रारदारावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी
होंडा पोलिस चौकीवर दगडफेक : चारचाकी गाडीचीही तोडफोड,तीन पंचसदस्यांविरोधात तक्रार दाखल
वाळपई : नरकासुर मिरवणुकीतील कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार होंडा पोलिस चौकीत दिल्याच्या रागातून सुमारे 200 पेक्षा जास्त जणांनी तक्रारधारकाला जीवे मारण्याची धमकी दिली. होंडा पोलिस चौकीसमोरच पार्क केलेल्या त्याच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली तसेच पोलिस चौकीवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणामध्ये होंडा पंचायतीचे काही स्थानिक पंचसदस्य सहभागी असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होंडा येथील रूपेश पोके यांनी वाळपई पोलिसस्थानकावर केली आहे.
त्याचप्रमाणे गाडीचे नुकसान करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. होंडा भागामध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून सध्यातरी तणावपूर्ण शांतता आहे. रूपेश पोके यांनी आपल्याला पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असून सरकारच्या मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन करुन कर्णकर्कश आवाजात नरकासुर मिरवणूक काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.
कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात पोलिस तक्रार
रूपेश पोके यांनी दाखल केलेला तक्रारीनुसार, 19 ऑक्टोबर रोजी संध्या. 7 वा.च्या सुमारास गौतम लक्ष्मण पार्सेकर, गिरीश लक्ष्मण पार्सेकर, नीलेश रंगनाथ परब, व्यंकटेश चारी या सर्वांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर खुर्च्या घालून रस्ता अडविला व कर्णकर्कश आवाज करुन स्थानिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार होंडा पोलिस चौकीवर महिला पोलिस निरीक्षक सनिशा नाईक यांच्याकडे केली व पुरावे सादर केले. तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यांनी पोलिस फौज फाट्यासह येत कर्णकर्कश आवाज बंद केला. मात्र पोलिस गेल्यानंतर काहीवेळाने पुन्हा एकदा संबंधितांनी मोठ्याने डीजे सुरु केला. रूपेश पोके व त्यांचे शेजारी सुनील अशोक नाईक यांनी वाळपई पोलिस स्थानकावर धाव घेऊन लेखी तक्रार सादर केली व कारवाई करण्याची मागणी केली.
मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन
नरकासुर मिरवणुकीत रात्री 10 वाजेपर्यंतच साऊंड सिस्टिमला परवानगी होती. त्यानंतर आवाज पूर्णपणे बंद करावा. मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन होणार नाही याची विशेष दखल घेण्यात यावी व यावर स्थानिक पोलिस यंत्रणेने लक्ष ठेवावे, असे निर्देश सरकारतर्फे देण्यात आले होते. असे असताना रात्री 10.30 वा. पुन्हा एकदा स्थानिक पंचसदस्य कृष्णा गावकर यांच्या नेतृत्वाखाली कर्णकर्कश आवाजाला सुऊवात झाली.
होंडा पोलिस चौकीवर 200 जणांचा जमाव, गाडीचे नुकसान
रुपेश पोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री पुन्हा आपण व सुनील नाईक होंडा पोलिस चौकीत आलो असता 200 जणांच्या जमावाने होंडा पोलिस चौकीवर येऊन आपल्याला जिवंत मारण्याची धमकी दिली. घाणेरड्या शिव्या दिल्या. सदर प्रकार पोलिसांसमोरच घडला. यावेळी पोलिस चौकीसमोर असलेली आपली स्वीफ्ट डिझायर स्वीफ्ट (जीए 11 ए 4966) गाडीची जमावाने नुकसानी केली. गाडीचे आरसे फोडले. गाडीमध्ये असलेला कॅमेरा व इतर सामानाचेही नुकसान केले. जोपर्यंत रूपेश पोके यांना आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याची धमकी यावेळी जमावाकडून देण्यात आली. या जमावात स्थानिक सरपंच शिवदास माडकर, पंचसदस्य कृष्णा गावकर यांच्याबरोबर गौतम पार्सेकर, गिरीश पार्सेकर, गौरीश पार्सेकर, नीलेश रंगनाथ परब, विशाल तुकाराम नाईक, सूरज बाबाजी देसाई, विशाल तुकाराम नाईक, व्यंकटेश चारी व इतर अनेकांचा समावेश होता, असे रुपेश पोके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिस चौकीवर दगडफेक
संतप्त जमावाने गाडीची नुकसानी करण्याबरोबरच पोलिस चौकीवर दगडफेक केल्याचे तक्रारीत स्पष्ट केलेले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे पोके यांनी स्पष्ट केले आहे. त्यावेळी चार वर्षीय मुलगा व शेजारी सुनील नाईक यांना सुदैवाने काहींनी बाजूला नेऊन त्यांची सुटका केली.
अपुरा पोलिस कर्मचारीवर्ग तरीही परिस्थितीवर नियंत्रण
या प्रकरणांमध्ये स्थानिक पंचसदस्य कृष्णा गावकर हा जमावाला संतप्त करण्याचा प्रयत्न करीत होता असा आरोप त्यांनी केलेला आहे. होंडा पोलिस चौकीवर कमी कर्मचारी असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सनिशा नाईक हतबल झाला तरीसुद्धा त्यांनी एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.
जबरदस्तीने माफी मागवून घेतली
दरम्यान, दाखल केलेल्या तक्रारीमुळे जमाव संतप्त बनला असून परिस्थितीवर नियंत्रण यावे यासाठी आपल्यावर माफी मागविण्यासाठी दबाव टाकण्यात आला. जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.
बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार केल्यानेच हल्ला
रूपेश पोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी सरपंचाच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात तक्रार दिली होती. सदर तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण ती तक्रार मागे न घेतल्यामुळे आपणाला धमकाविण्यासाठी सदर प्रकरण पद्धतशीरपणे घडवून आणले, असा आरोप पोके यांनी केलेला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तक्रार दिली म्हणून तक्रारदारालाच मारहाण करण्याचा प्रयत्न हा खरोखरच दुर्दैवी प्रकार आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.