For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवजड वाहतुकीने नुकसान झाल्यास भरपाई

03:44 PM Sep 17, 2025 IST | Radhika Patil
अवजड वाहतुकीने नुकसान झाल्यास भरपाई
Advertisement

चिपळूण :

Advertisement

पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतूक शिरगांव, पेढांबे, खडपोली मार्गे रात्रीची सुरू करण्यात आली. मात्र यामुळे अवजड वाहतुकीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अवजड वाहतुकीने नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली. तर यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला विरोध चालणार नसल्याचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी ठणकावले.

पूल खचल्यानंतर एमआयडीसीसाठी पर्यायी मार्गाने रात्रीची वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र अवजड वाहतुकीमुळे रस्त्याजवळच्या शेतीचे, मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार करत काही शेतकऱ्यांनी या वाहतुकीला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संबंधित शेतकरी तन्वीन खडपोलकर यांच्यासह काही शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी लिगाडे यांची भेट घेतली. यावेळी आमदार निकमही उपस्थित होते. खडपोलकर यांनी अवजड वाहतूक करताना शेतकऱ्यांना कुणीही विश्वासात घेतले नसल्याचे सांगत होत असलेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल केला. यावर आमदार निकम यांनी सांगितले की, यापूर्वीच कारखानदारांना आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला असून बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेटही आपण घेणार आहोत. पूल होईपर्यंत ६ ते ७ महिन्यांचा कालावधी असून त्या दरम्यान हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. कारखाने बंद करून काहीही साध्य होणार नाही. असंख्य कामगार या एमआयडीसीत काम करतात. त्यामुळे त्यांचाही विचार करणे गरजेचे आहे. अवजड वाहतुकीमुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. आहे तोच रस्ता वापरात येणार आहे. मात्र तरीही नुकसान झाल्यास त्याला भरपाई दिली जाईल, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

Advertisement

प्रांताधिकारी लिगाडे यांनीही, वाहतूक सुरू करणे, हे सर्वांच्या दृष्टीने योग्य आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत २७ वीजखांब हटवण्यात आले आहेत. रस्त्याच्या बाजूपट्टया मजबूत केल्या जात आहेत. कुणाचेही शेतीचे नुकसान होणार नाही. लवकरच खडपोली ग्रामपंचायतीत सर्वांची बैठक घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.