सी-बर्ड विस्थापित कुटुंबीयांना 10.47 कोटींची भरपाई मंजूर
कारवार : संरक्षण मंत्रालयाने सी-बर्ड विस्थापित कुटुंबीयांना गोड बातमी दिली आहे. कारण 2008-09 पासून प्रलंबित असलेल्या 28/ए प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने 10.47 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या विस्थापित कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. येथून जवळच्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाकांक्षी सी-बर्ड प्रकल्याच्या उभारणीसाठी कारवार आणि अंकोला तालुक्यातील अनेक खेड्यातील शेकडो कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले होते. तथापि स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबीयांना वेळेत नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली नव्हती किंवा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे विस्थापित कुटुंबाची आर्थिक कुचंबणा झाली होती.
नुकसानभरपाईचे प्रकरण प्रलंबित पडल्याने याची दखल कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी गांभीर्याने घेतली व वेळेत सीबर्ड प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी व विस्थापितांशी संपर्क आणि संवाद साधला. त्यानंतर खासदार हेगडे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्याशी चर्चा करुन 28/ए प्रकरणातील 57 विस्थापित कुटुंबीयांना 10.47 कोटी रुपये मंजूर करून घेण्यात यश मिळविले. 10.47 कोटी रुपये मंजूर केल्याने कारवार आणि अंकोला तालुक्यातील अमदळ्ळी, बिनगा, कोडार, चंडीया, हट्टीकेरी, बिराडे आदी गावातील विस्थापितांना उशीरा का होईना न्याय मिळाला आहे.