For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर बाधित पिकांची नुकसान भरपाई लवकरच

12:01 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
पूर बाधित पिकांची नुकसान भरपाई लवकरच
Compensation for flood-affected crops to be announced soon
Advertisement

ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन दिवसांत जमा होणार भरपाईची रक्कम
जिह्यातील शेतकऱ्यांना 122.42 कोटींचा फटका
जिल्ह्यात 47 हजार 891 हेक्टरवरील पिके बाधित
शिरोळ, हातकणंगले, करवीरमध्ये सर्वाधिक नुकसान

Advertisement

कोल्हापूर: कृष्णात चौगले

जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 47 हजार 891 हेक्टरवरील पिके कुजली असून यामध्ये शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून या पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे बँकेत जमा केली आहे. स्थानिक तलाठी कार्यालयांकडून त्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहेत. त्यामध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर पुढील दोन दिवसांत त्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे.
जिह्यात जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांना महापूर आला. नद्यांची पात्रे विस्तृत झाल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टी काळात नद्यांची पाणी पातळी गतीने वाढत गेली. त्यामुळे जिह्यात महापुराची परिस्थिती ओढावली. पर्जन्यमान कमी झाल्यानंतर नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने घट झाली. यामुळे सुमारे दहा दिवसांहून अधिक काळ पिके पाण्याखालीच राहिली. बरेच दिवस पीक पाण्यात राहिल्याने ते पूर्णत: कुजून गेले. महापूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे गतीने पंचनामे केले. त्यानुसार जिह्यातील 47 हजार 891 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायती पिके 7500 हेक्टर, बागायती पिके 40,300 हेक्टर आणि फळबागांचे 37 हेक्टर वरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
1 लाख 62 हजार 800 शेतकऱ्यांची पिके पूरबाधित
जिह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 800 इतक्या शेतकऱ्यांची पिके पूरबाधित झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना 122.42 कोटींचा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाने महापूर बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता.

Advertisement

 अशी मिळणार नुकसान भरपाई
बागायती पिक :     प्रतिगुंठा 175 रूपये (हेक्टरी 17 हजार 500 रूपये )
जिरायत/ कोरडवाहू : प्रतिगुंठा 85 रूपये  (हेक्टरी 8500 रूपये )

  ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे
पूरग्रस्त व अतिवृष्टीमध्ये बाधित पिकांच्याशेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड आणि आधारकार्डशी संलग्नित असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक पासबुकसह लाभार्थ्यांने स्वत: संबधित महा-ई सेवा केंद्र अथवा ज्या ठिकाणी ई-केवायसी केली जाते, तेथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी
पूरबाधित शेतपिकांचे पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार शासनाने निधीची तरतूद करून बँकांमध्ये भरपाईची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर त्वरीत भरपाईची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे पैसे शासनाकडून बँकेत जमा झाले आहेत, त्यांची यादी कृषी व महसूल विभागाकडून ई-केवायसी करण्यासाठी जाहीर केली आहे. त्या शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी. तसेच शासनाकडून उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे देखील लवकरच जमा केले जातील. त्यामुळे त्यांनाही नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे.
जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

तालुकानिहाय पूरबाधित क्षेत्र

तालुक्याचे नाव       पूरबाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
शिरोळ                    10,000
हातकणंगले               9500
करवीर                      7687
कागल                       2453
राधानगरी                  1487
गगनबावडा                1297
पन्हाळा                      5924
शाहूवाडी                    4673
चंदगड                       2309
भुदरगड                     1093
गडहिंग्लज                  807
आजरा                       361
एकूण                      47891

Advertisement
Tags :

.