कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना असेही प्रोत्साहन
कंपन्या व कंपनी व्यवस्थापनातर्फे आपापल्या स्तरावर व विविध प्रकारे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. या प्रोत्साहनाचा वा अशा उपक्रमांचा फायदा कर्मचारी कंपनी या उभयतांना होत असतो. यामध्ये प्रत्यक्ष व्यवसाय व तत्सम कामावर भर असणे स्वाभाविक असते. मात्र त्याशिवाय पण अन्य प्रकारे व विविध स्वरुपात पुढाकार घेऊन सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार व आवर्जुन काम करावे यासाठी भारतातील प्रमुख कंपन्या ज्या प्रकारे व पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देत आहेत ते मुळातून पडताळून पाहण्यासारखे ठरते.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारे परोपकारी व सामाजिक काम करण्यासाठी आवर्जून प्रोत्साहित करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपल्याकडील इन्फोसिस, प्रॉक्टर अँड गॅम्बल, कॅप जेमिनी, स्टँडर्ड चार्टर्ड, हिंदुस्थान युनिलिव्हर, वेट अॅप व प्राईस अँड वॉटर यासारख्या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उदाहरणादाखल नमूद केलेल्या कंपन्यांतर्फे आपल्या कर्मचाऱ्यांना समाजातील विविध घटक व क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य सेवा, नागरी सेवा व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण इ. विषयात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व प्रसंगी मार्गदर्शन केले जाते. विविध कंपन्यांच्या या समाजाभिमुख व कर्मचारी प्रवण उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांना समाजसेवेसाठी देण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी याकामी अधिकाधिक वेळ परिणामकारकरित्या देणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणे, त्यांच्या प्रयत्नांचे मूल्यमापन करून त्यांना आवश्यकतेनुरुप मार्गदर्शन करणे, त्यांच्या समाजसेवी प्रयत्नांना अधिक परिणामकारक करणे व अशा प्रकारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांमधून सवलत मुभा देणे व त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे इ. चा समावेश आहे. याशिवाय काही कंपन्यांमध्ये तर सातत्यपूर्ण व परिणामकारकपणे समाजोपयोगी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यशस्वी प्रयत्नांची दखल त्यांच्या कामकाजाचे वार्षिक मूल्यमापन व पगारवाढीच्यावेळी केले जाते हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांना सुलभ व सामान्यजनांना उपयुक्त व प्रसंगी कमी वा फावल्या वेळात करता येण्यासारख्या कार्यक्रम-उपक्रमांना आवर्जुन प्राधान्य दिले जाते. यामध्ये इंजिनिअरिंग अथवा एमबीए पात्रता पूर्ण केलेल्या अथवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखतीची पूर्व तयारी, संवाद संभाषण कला, व्यक्तिमत्त्व विकास इ.चा प्रामुख्याने समावेश असतो. या प्रयत्नांचा संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीनंतरच्या रोजगारासाठीच्या मुलाखतीला सामोरे जातांना विशेष फायदा होतो. याशिवाय या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे मोठे समाधान संबंधित कर्मचाऱ्यांना लाभत असते.
काही कंपन्या तर याच प्रयत्नातील पुढील टप्प्यात छोटी शहरे, जिल्हा स्थाने वा तत्सम ठिकाणच्या विशेषत: इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्यक्ष उद्योगांसाठी वा उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक विषयांवर व्याख्यानवजा मार्गदर्शन करण्याची व्यवस्था करतात. याकामी कंपन्यांच्या अनुभवी तंत्रज्ञ वा व्यवस्थापकांना प्रोत्साहन दिले जाते व त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या विद्यार्थी-पदवीधरांना होतो. याशिवाय प्रत्यक्ष उद्योग कारखान्याला भेट व चर्चा, अल्पकालीन उमेदवारी प्रशिक्षण इ. पण या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या कौशल्य विकासाचे काम या कंपन्या व त्यांचे कर्मचारी समाधानकारकरित्या करतात. या उपक्रमाचा फायदा गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 78000 विद्यार्थ्यांना झाला ही आकडेवारी पुरेशी बोलकी ठरते.
याच धरतीवर प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमाचा लाभ सुमारे 50,000 विद्यार्थ्यांना झाला आहे. अशा प्रकारे शिक्षण आणि शिक्षणाशी संबंधित विविध उपक्रमांना आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
याचाच परिणाम म्हणजे प्रॉक्टर अँड
गॅम्बल कंपनीच्या प्रयत्न आणि पुढाकारातून स्वयंसेवी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे 250 युवकांना एकत्रित करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांच्या विविध गटांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रम व पात्रतेच्या जोडीला त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या भावनिक प्रज्ञाशीलता, सकारात्मक विचार, सहकारी कार्यपद्धती, विश्लेषणपर वृत्ती, व्यावसायिक पत्रव्यवहार, संभाषण कला, स्वत:चा करिअर विकास व त्यासाठी करावयाचे प्रयत्न इ. बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीचा हा विद्यार्थी विकास प्रकल्प युवा स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर व पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राशिवाय गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात व तामिळनाडू या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला. याला चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास विषयक प्रयत्नात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष विकास विषयक उपक्रम यशस्वीपणे राबविणारी कंपनी म्हणून
कॅप जेमिनी कंपनीचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार कॅप जेमिनी कंपनीच्या 90000 कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी आपल्या उत्स्फूर्त प्रयत्नातून 2,43,000 तास प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी मोठे काम केले. याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
आगामी काळात कंपनी कर्मचाऱ्यांच्या या विशेष उपक्रम प्रयत्नात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा कंपनीचा मानस आहे. या नव्या उपक्रमात नव्याने पदवी वा पदविका उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी योग्य प्रकारे स्वत:ची माहिती मांडणे, मुलाखतीची पूर्व तयारी, मुलाखतीचा सराव, अभिरूप मुलाखत यासारखे मार्गदर्शन केले जाते हे विशेष. याशिवाय आता विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय साक्षरतेची जोड दिली जाणार आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत तर कंपनीच्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3 दिवसांची विशेष रजा सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून समाजकार्य करण्यासाठी दिली जाते. या दरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांच्या समाजकार्य प्रकल्पासाठी मार्गदर्शन व गरजेनुरुप सहाय्य केले जाते.
स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सामाजिक प्रयत्नातून सुमारे 12000 कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी निवडक शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते. यासाठी काही कर्मचाऱ्यांनी अशा गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे. यातून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शनासह पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया व विविध उपलब्ध संधी पोहोचविण्याचे मोठे व महत्त्वाचे काम होत आहे.
यावर्षीपासून हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम सातत्याने करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक योगदानाची विशेष नोंद घेत त्यांच्या यशस्वी प्रयत्नांसाठी त्यांना प्रोत्साहनासह पुरस्कृत करण्याची विशेष योजना आखली आहे. हा उपक्रम कंपनीच्या 16 उत्पादक कारखान्यांसह मुख्यालय व विविध कार्यालयाच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. कंपनी अंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून याकडे कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी पहात आहेत. कंपनी व्यवस्थापनानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 80 टक्के कर्मचाऱ्यांनी समाजकार्यात आपले योगदान द्यावे, यासाठी प्रयत्न करण्याची महत्त्वाकांक्षी योजना कंपनी-कर्मचारी या उभयतांनी संयुक्तपणे आखली आहे. पूर्वी कंपनी स्तरावर समाजसेवा वा सामाजिक कामासाठी केवळ आर्थिक मदत देऊन आपल्या सामाजिक भानाची इतिश्री मानणाऱ्या कंपन्या आज याकामी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रोत्साहन देत आहेत ही बाब निश्चितच अभिनंदनीय ठरते.
दत्तात्रय आंबुलकर