चाकरमान्यांच्या नशिबी यंदाही खड्ड्याचे ‘विघ्न’
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून कोकणातील घराघरांमध्ये बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या भागांतून लाखो चाकरमानी आणि गणेशभक्त दरवर्षी अत्यंत उत्साहाने आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. मात्र, या आनंदाच्या उत्सवावर गेल्या दीड दशकाहून अधिक काळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (ऱ्प्-66) रखडलेल्या चौपदरीकरणाचे सावट पसरलेले आहे. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. महामार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे यावर्षीही चाकरमान्यांना आणि गणेशभक्तांना जीव मुठीत धरूनच कोकणात आपल्या गावी यावे लागणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा होऊन आणि काम सुरू होऊन तब्बल 17 वर्षे उलटली आहेत. या काळात अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र कोकणवासीयांच्या नशिबातील खड्डे आणि वाहतूक कोंडी सुटली नाही. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना महामार्गाची जाग येते. घाईघाईने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले जातात. काही ठिकाणी डांबराची मलमपट्टी केली जाते. मात्र, पहिल्याच पावसात ही मलमपट्टी वाहून जाते आणि रस्ता पुन्हा ‘जैसे थे’ होतो. दरवर्षी काम पूर्ण करण्याच्या नवीन तारखा आणि डेडलाईन्स जाहीर केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर संथ गतीने काम सुरू असल्याने या तारखा केवळ कागदावरच राहतात, हा आजवरचा अनुभव आहे.
कोकणी माणसासाठी गणेशोत्सव हा केवळ सण नसून एक भावनिक सोहळा आहे. या दिवसांत मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते. महामार्गावरील इंदापूर, माणगाव यासारख्या प्रमुख बायपास मार्गांची कामे आणि काही ठिकाणच्या उ•ाणपुलांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने यंदाही प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी टोल वसुलीच्या चर्चा आणि घोषणा केल्या जातात, मात्र प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षित रस्ते देण्यास शासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ‘आम्ही वर्षभर कर भरतो, मग सणासुदीलाही आम्हाला खडतर आणि जीवघेणा प्रवास का करावा लागतो?’ असा संतप्त सवाल चाकरमानी विचारत आहेत. महामार्गाच्या बाबतीत राजकीय पोकळ आश्वासने आणि प्रशासकीय अनास्था नेहमीच दिसून येते. केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत अनेकांनी या महामार्गाची पाहणी करून ‘यंदाचा प्रवास सुखकर होईल’ अशी आश्वासने दिली होती. काही टप्प्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे टप्पे अजूनही रखडलेलेच आहेत. कंत्राटदारांचे वाद, जमीन संपादनातील अडचणी आणि प्रशासकीय पातळीवरील समन्वयाचा अभाव यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात रेंगाळलेला प्रकल्प ठरला आहे. यंदाही केवळ एकेरी वाहतूक सुरू करण्याचा किंवा तात्पुरते खड्डे भरण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो गणेशभक्तांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून सद्यस्थिती पाहता संपूर्ण महामार्ग अखंडपणे वाहतुकीसाठी उपलब्ध होण्यासाठी डिसेंबर 2026 पर्यंतची नवीन डेडलाईन ठेवण्यात आली आहे, तर काही तज्ञांच्या मते पूर्ण जोडणीसाठी 2027 उजाडू शकते. रायगड जिह्यातील माणगाव येथील बायपासचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. सध्या येथे सुमारे 85 टक्के काम झाले असून आगामी गणेशोत्सवापूर्वी याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन प्रशासनातर्फे सुरू आहे. इंदापूर येथील बायपासचे काम सुमारे 95 टक्के पूर्ण झाले असले, तरी अंतिम टप्प्यातील काम अद्याप प्रलंबित आहे. हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. चिपळूण येथील उ•ाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून वाहन चालकांना येथे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. संगमेश्वर आणि पाली भागात उ•ाणपुलांचे आणि अऊंद रस्त्यांचे काम अजूनही प्रलंबित आहे. संगमेश्वर येथील काम ऑक्टोबर-डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
लांजा ते संगमेश्वर दरम्यान या पट्ट्यात काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम अद्याप तुकड्या-तुकड्यांमध्ये सुरू आहे. वडखळ पुलाजवळ नुकतेच मोठे ख•s व भगदाड पडल्याने आणि निकृष्ट कामामुळे दुऊस्तीचे काम पुन्हा रखडले आहे. ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिह्यात दोन टप्प्यातील काम 99 टक्के पूर्ण झाले असून लांजा ते गोवा सीमेपर्यंतचा रस्ता पूर्णपणे सुसाट आणि उत्तम स्थितीत आहे. मात्र, रायगड आणि रत्नागिरी जिह्यातील महत्त्वाचे उ•ाणपूल आणि बायपास अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम हे केवळ एका रस्त्याचे काम नसून ती कोकणाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाची कोंडी आहे. गणेशोत्सवाला अवघा महिना शिल्लक असताना आता तरी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून किमान महामार्ग ख•sमुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, यंदाचा गणेशोत्सवही चाकरमान्यांसाठी, समस्त कोकणवासीयांसाठी मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणारा ठरेल, यात शंका नाही. शासनाने आता पोकळ तारखा देण्याऐवजी प्रत्यक्ष दर्जेदार काम करून दाखवावे, हीच संपूर्ण कोकणवासीयांची तीव्र भावना आहे.
संदीप गावडे