For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांसोबत संवाद वाढवा! विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी

11:24 AM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांसोबत संवाद वाढवा  विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी
Advertisement

सराईत गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करा; पोलीस दलाची आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सराईत गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करा. पोलीस दलाने मंडळांसोबत बैठक घेवून त्यांच्याशी संवाद वाढवावा अशा सुचना विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या. तसेच आगामी विधानसभा, गणेशोत्सव काळात सिमाभागातून अंमली पदार्थ, शस्त्र तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एक विशेष पथकाची नेमणूक करण्याच्या सुचनाही फुलारी यांनी दिल्या.

Advertisement

शनिवारी रात्री पोलीस मुख्यालयामध्ये आगामी सण, निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी कोल्हापूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, प्रमुख उपस्थित होते. तसेच गतवर्षी पेक्षायंदा कोल्हापूर जिह्यातील गुह्यांची संख्या घटली आहे. प्रामुख्याने बलात्कार, विनयभंग, चोऱ्या, घरफोड्या रोखण्यात पोलिस दलास यश आले, याबद्दल कोल्हापूर पोलीस दलाचे विशेष अभिनंदनही फुलारी यांनी केले.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आगामी काळात गणेशोत्सव, ईद, सण उत्सवांच्या काळात सतर्क राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबतच्या सुचना केल्या. गणेशोत्सव काळात गावभेटी, शांतता समितीच्या बैठका, गणेश उत्सवांच्या बैठकांसोबत इतर विभागांसोबत समन्वय ठेवून संबंधीत कामांची पुर्तता करुन घेण्याच्या सुचना दिल्या. तसेच महिलांविषयक गुह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये जावून मुलांना मार्गदर्शन करणे, दामिनी, निर्भया पथके अॅक्टीव्ह करण्याच्या महत्वाच्या सुचनाही फुलारी यांनी दिल्या.

Advertisement

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी गणेशोत्सव काळात करावयाच्या प्रतिबंधात्मक कारवायांची यादी तयार करण्यात आली. काही टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाईही करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शाळा, महाविद्यालये येथे सिसीटीव्ही कॅमेरे आहेत काय, तेथील सुरक्षा रक्षक, निर्भया पेटी यांची तपासणी करण्याच्या सुचना प्रत्येक अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत दिली.

बैठकीला शहर पोलीस उपअधिक्षक अजित टिके, करवीर पोलीस उपअधिक्षक सुजय क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधीकारी उपस्थित होते.

सोशल मिडीयावर विशेष नजर
सद्या कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सोशल मिडीयावर नजर ठेवण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट, जातीमध्ये तेढ निर्माण करणारे मॅसेज, व्हिडीओ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पथक कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.

बलात्कार,विनयभंगाच्या घटनेत घट, खून, मारामारीत वाढ
कोल्हापूर जिह्यातील क्राईमचा आढावाही यावेळी घेण्यात आला. यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले. मात्र बलात्कार, विनयभंग, दरोडा, फसवणूक, चोरी, घरफोडी या घटनांमध्ये घट झाले असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

शिये घटनेचा छडा 8 तासात
शिरोली एमआयडीसी येथे 10 वर्षीय बालिकेवर लैगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून निर्घुण खून करण्यात आला होता. या संवेदनशील घटनेचा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासह स्थानिक पोलीसांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी फॉरेन्सिक टिम, श्वान पथक यांच्या मदतीने 8 तासामध्ये छडा लावून आरोपीस जेरबंद केले. याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्यासह तपास पथकाचे विशेष अभिनंदन केले.

आकडेवारी
घटना जुलै 2023 जुलै 2024 वाढ/ घट
खून 31 41 10 वाढ
खूनाचा प्रयत्न 45 51 6 वाढ
बलात्कार 120 113 7 घट
विनयभंग 263 205 57 घट
दरोडा 8 3 5 घट
चोरी 1189 920 269 घट
घरफोडी 253 221 32 घट
फसवणूक 908 130 778 घट

Advertisement
Tags :

.