गैरसमज दूर करण्यासाठी संवाद आवश्यक
जमात ए इस्लामी हिंदतर्फे सद्भावना बैठक
► प्रतिनिधी / बेळगाव
समाजामध्ये धर्माधर्मात जाती-जातीमध्ये संवाद कमी झाल्यामुळे एकमेकांबद्दल अपसमज निर्माण झाले आहेत. ही कृती समाजासाठी मारक आहे. एकमेकांशी संवाद साधून निर्माण झालेल्या समस्यांवर मार्ग काढणे शक्य आहे. यासाठी संवाद गरजेचा आहे. समाजात शांतता व सौहार्दता निर्माण करण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शांती प्रकाशन मंगळूरचे मोहम्मद कुन्ही यांनी केले.
येथील जमात ए इस्लामी हिंदच्या सद्भावना मंचतर्फे ‘धार्मिक एकता शांतता आणि सौहार्दता’ या विषयावर आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रामकृष्ण मिशनचे स्वामी मोक्षात्मानंद, स्वामी मडिवाळ राजयोगींद्र, गुरुद्वाराचे ग्यानी प्रभज्योत सिंग, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या बी. के. विद्या, जमात ए इस्लाम हिंदचे अध्यक्ष डॉ. बेलगामी मोहम्मद साद, व्हाईस चेअरमन मोहम्मद सलीम, जमात ए इस्लामी हिंद बेळगावचे अध्यक्ष शाहीद मेमन उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, राजकीय हितासाठी जाती-जातीमध्ये भांडणे लावून द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यावर वेळीच प्रतिबंध लावला पाहिजे. यासाठी समाजात एकता, समरसता, सौहार्दता निर्माण करणे काळाची गरज आहे. यासाठी एकमेकांशी संवाद महत्त्वाचा दुवा आहे. प्रत्येक धर्मातील धर्मगुरुंनी मानवतेची शिकवण दिली आहे. ही शिकवण आजच्या पिढीला देण्याची गरज आहे. समाजामध्ये आदर्शांची कमतरता होत चालल्याने तरुण भरकटत चालला आहे. यासाठी तरुणांसमोर आदर्श व्यक्ती निर्माण करणे आजच्या समाजाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष शाहीद मेमन यांनी समाजात नेहमीच एकमेकाचा आदर केल्यानेच पुढे वाटचाल करू शकतो. यासाठी प्रत्येक धर्माचा आदर करून मानवी मूल्यांची जोपासना केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. राजकीय हितासाठी समाजामध्ये द्वेष पेरण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आरोग्यवंत समाजाच्या निर्मितीसाठी हातभार लावला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून समाजामध्ये जातीय भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही समाजासाठी मारक बाब आहे. त्यासाठी अशा संघटनांनी पुढाकार घेऊन समाजात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, असे मोहम्मद सलीम यांनी सांगितले.
रामकृष्ण आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद म्हणाले, जगामध्ये देव एक असून त्याची नावे अनेक आहेत. जगातील प्रत्येकासाठी पृथ्वी एक आहे, सूर्य एक आहे त्यामुळे सर्वांनी एकतेची भावना राखून सर्व धर्मीयांचा आदर करून आदर्श समाज निर्माण केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित धर्मगुरुंनी मोलाचे मार्गदर्शन केले. जुबेर खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.