For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शास्त्रीय संशोधन समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज!

01:30 PM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
शास्त्रीय संशोधन समाजापर्यंत पोहोचविणे काळाची गरज
Advertisement

‘सागर महोत्सव’सारख्या उपक्रमांमुळे नागरिक सजग बनतात : माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख

Advertisement

रत्नागिरी : आजचा सर्वात मोठा पर्यावरणीय धोका म्हणजे अज्ञान नव्हे, तर निसर्गाशी मानवाचे तुटलेले नाते आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यातील संवाद कमी होत चालला आहे. ‘सागर महोत्सवा’सारखे कार्यक्रम हा संवाद पुन्हा जोडतात. शास्त्राrय संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमधून गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय सहज, अनुभवाधारित आणि मानवी पातळीवर समजावले जातात. यामुळे नागरिक केवळ प्रेक्षक राहत नाहीत, तर सजग सहभागी बनतात, अशा शब्दात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी ‘सागर महोत्सवा’चे कौतुक केले. रत्नागिरी येथे पार पडलेल्या चौथ्या सागर महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आले असता, ते बोलत होते. हवामान बदल, समुद्री जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण या जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे आणि तो घडवण्यासाठी अशा महोत्सवांची नितांत गरज असल्याचे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.

समुद्राकडे पाहण्याची पारंपरिक दृष्टी बदलतो

Advertisement

सागर महोत्सव महत्त्वाचा आहे कारण तो समुद्राकडे पाहण्याची आपली पारंपरिक दृष्टी बदलतो. समुद्र हा केवळ भौगोलिक विस्तार किंवा संसाधनांचा साठा नसून पृथ्वीवरील जीवनाचा आधारस्तंभ आहे हे सत्य अशा उपक्रमांतून ठळकपणे समोर येते. पृथ्वीवरील प्रत्येक दुसरा श्वास समुद्रामुळे शक्य होतो. हवामान, अन्नसाखळी, जैवविविधता आणि मानवी संस्कृती यांचा तो अविभाज्य भाग आहे. सागर महोत्सव या नात्याला वैज्ञानिक आधार देतो, भावनिक संदर्भ देतो आणि नैतिक जबाबदारीची जाणीव करून देतो. अशा कार्यक्रमांमधून समुद्र ‘दूरचा निसर्ग’ न राहता ‘आपल्या अस्तित्वाचा भाग’ बनतो. आणि हीच जाणीव भविष्यातील संरक्षणासाठी सर्वात महत्वाची पायरी आहे, असे डॉ. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

विषयांची निवड सुसंगत, भविष्यदर्शी

महोत्सवातील विषयांची निवड ही अत्यंत सुसंगत आणि भविष्यदर्शी होती. खोल समुद्रातील खनिजसंपत्तीपासून ते समुद्री सस्तन प्राणी, हवामान बदल, सार्वजनिक सहभाग आणि शाश्वत पर्यटन या सर्व विषयांनी समुद्राचा बहुआयामी चेहरा उलगडला. व्याख्याते केवळ माहिती देणारे नव्हते, तर ते अनुभवाचे साक्षीदार होते. त्यामुळे श्रोत्यांना ज्ञानासोबत संदर्भ आणि संदर्भासोबत जबाबदारी मिळाली. या महोत्सवातून एक स्पष्ट संदेश साध्य झाला तो म्हणजे, समुद्राचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही तर अर्थव्यवस्था, संस्कृती आणि नैतिकतेचा आहे. विज्ञान, समाज आणि धोरण यांना जोडणारा हा संवाद हीच या उपक्रमाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले.

बौद्धिक, भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण प्रतिसाद

महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी डॉ. देशमुख म्हणाले, विद्यार्थी प्रतिसाद हा या महोत्सवाचा सर्वात आशादायी पैलू ठरला. पर्यावरण संरक्षणाचे खरे भविष्य या पिढीच्या हातात आहे. एकूण 450 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभाग केवळ संख्यात्मक नव्हता तर तो बौद्धिक आणि भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण होता. प्रश्नोत्तर सत्रातील प्रश्न, चर्चेतील सहभाग, तसेच सर्जनशील उपक्रमांतून व्यक्त झालेली जिज्ञासा हे सर्व तऊण पिढीची गंभीरता दर्शवणारे होते. विद्यार्थ्यांनी समुद्राकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नाही तर भविष्यातील स्वत:च्या जबाबदारीच्या रूपात पाहिले, हे अत्यंत दिलासादायक आहे. विद्यार्थ्यांचा असा प्रतिसाद म्हणजे आशेचा ठोस पुरावा असल्याचा विश्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

सागर महोत्सव व्यापक होणे अपरिहार्य!

सागर महोत्सवाचा प्रवास पाहता तो अधिक व्यापक होणे अपरिहार्य वाटते. कारण या उपक्रमाची मुळे स्थानिक असली तरी त्याचे प्रश्न आणि उत्तरं जागतिक आहेत. विज्ञान, शिक्षण, प्रशासन, कला आणि समाज यांना एकत्र आणण्याची क्षमता या महोत्सवात आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक शहरांमध्ये, अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये आणि अधिक समुदायांपर्यंत पोहोचू शकतो. डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने तो आंतरराष्ट्रीय संवादाचाही भाग बनू शकतो. परंतु त्याची खरी ताकद व्यापकतेपेक्षा प्रामाणिकतेत आहे. जर ही मूल्यनिष्ठा टिकवली गेली तर सागर महोत्सव केवळ मोठा नाही, तर महत्वाचा होत जाईल आणि तेच कोणत्याही पर्यावरणीय चळवळीचे अंतिम ध्येय असते, असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले.

सागर महोत्सव राष्ट्रीय चिंतनाचा विषय

सागर महोत्सव अर्थात SEAVERSE केवळ एका संस्थेचा किंवा एका शहराचा उपक्रम राहात नाही तर तो राष्ट्रीय चिंतनाचा विषय ठरतो. समुद्र, हवामान, जैवविविधता आणि मानवी जबाबदारी यांचा परस्पर संबंध समजावून सांगणारा हा उपक्रम भारताच्या दीर्घकालीन पर्यावरणीय दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले.

Advertisement
Tags :

.