'स्मार्ट मीटरला सामान्यांनी त्वरित आणि जोरदार विरोध करावा
राज्य वीज ग्राहक संघटनेचे सचिव जावेद मोमीन यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत वीज ग्राहकांचा जनता दरबार
सावंतवाडी । प्रतिनिधी
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे देशभरात वीज ग्राहकांना बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर बाबत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः घरगुती ग्राहकांसाठी हे मीटर पूर्णपणे अयोग्य आणि त्रासदायक ठरणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने केला आहे. 'स्मार्ट मीटर' हे भविष्यात प्रीपेड मीटर मध्ये रूपांतरित होणार असून, त्यामुळे ग्राहकांना वाढीव वीज बिले येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी या मीटरला त्वरित आणि जोरदार विरोध करावा, असे थेट आणि महत्त्वपूर्ण आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे राज्य सचिव जावेद मोमीन यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांचा जनता दरबार या कार्यक्रमात ते बोलत होते. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित या दरबारात, ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या वाढीव बिलांबाबत आणि स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली सध्याचे मीटर फॉल्टी ठरवण्याच्या तक्रारी मांडल्या. या सर्व प्रश्नांना जावेद मोमीन यांनी समर्पक उत्तरे देत, ग्राहक हितासाठी संघर्ष करण्याची हाक दिली.जावेद मोमीन यांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात अत्यंत ठोस आणि ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट केले की, अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर यात फारसा फरक सांगितला जात नाही. आज बसवण्यात आलेला स्मार्ट मीटर हा भविष्यात निश्चितपणे प्रीपेड मीटर बनेल.मोमीन यांनी स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांना वाढीव बिले येणार आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे या मीटरचा स्पीड (वेग) सध्याच्या मीटरपेक्षा अधिक आहे. ते म्हणाले की, "साधा चार्जर जरी लावला, किंवा घरातली पूर्ण वीज बंद असली आणि कुठेतरी वीज लिकेज (groud fault) जरी असले, तरी या मीटरमध्ये युनिट्सची नोंद होणार आहे. यामुळे वीज बिल ज्यादा येणार आहे. सामान्य ग्राहकांना हे निश्चितच परवडणारे नाही."
प्रेशर, खर्च आणि ग्राहकांवरील आर्थिक भार
मोमीन यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकार केंद्र सरकारच्या नावावर प्रेशर आणून स्मार्ट मीटर बसवण्यास सांगत आहे.स्मार्ट मीटरला मार्च २०२३ मध्ये मंजुरी मिळाली, तेव्हा त्याची किंमत सुमारे ₹६,००० होती. मात्र, ऑगस्ट २०२० ते २०२३ मध्ये टेंडर काढल्यानंतर याच मीटरची किंमत ₹११,९०० पर्यंत वाढली आहे.केंद्र सरकार हे मीटर बसवण्यासाठी राज्य सरकारला केवळ ₹९०० देणार आहे.वीज वितरण कंपन्या (डिस्कॉम्स) सुरुवातीला हे पैसे ग्राहकांकडून घेणार नसल्याचे सांगत असल्या तरी, भविष्यात हे पैसे ग्राहकांकडूनच वसूल केले जाणार आहेत. यामुळे घरगुती ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडेल, असे मोमीन यांनी ठामपणे सांगितले.
औद्योगिक ग्राहकांसाठी योग्य; घरगुती ग्राहकांसाठी त्रासदायक
जावेद मोमीन यांनी स्मार्ट मीटरच्या उपयुक्ततेवर भाष्य करताना म्हटले की, स्मार्ट मीटर हे औद्योगिक ग्राहकांसाठी योग्य असू शकतात. औद्योगिक ग्राहकांना त्यांच्या कामाचे अचूक मोजमाप, किती काम झाले हे कळणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मीटर योग्य आहे. परंतु, घरगुती ग्राहकांसाठी तो त्रासदायक ठरणार आहे आणि वाढीव बिले आणणार आहे. त्यामुळे या मीटरला मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची गरज आहे.जनता दरबारात मीटर बदलण्याची सक्ती करण्याच्या तक्रारीही आल्या. यावर मोमीन म्हणाले की, "मीटर बदलण्याची सक्ती कुणीही करू शकत नाही. परंतु सध्या सक्तीने मीटर बदलण्यात येत आहेत. तसेच, ग्राहकांची परवानगी न घेता चोरून मीटर बसवले जात असतील तर ते पूर्णपणे अयोग्य आहे. या सक्तीलाही विरोध झाला पाहिजे."त्यांनी यावेळी वीज दरवाढीवर देखील भाष्य केले. वीज वितरण कंपनीकडून घरगुती सर्व प्रकारच्या विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वातावरणामुळे या दरवाढीला स्थगिती देण्यात आली असली तरी, भविष्यात वीज बिले वाढीव येणार आहेत, अशी स्पष्ट सूचना त्यांनी ग्राहकांना दिली.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख विक्रांत पाटील यांनी ग्राहकांना संघटित होण्याची आणि जागरूक होण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली.पाटील यांनी स्पष्ट केले की, वीज वितरण कंपनी अचानक वीज बिले वाढवू शकत नाही. दरवाढीचा प्रस्ताव ते वीज नियामक आयोगाला सादर करत असतात. त्यानंतर आयोग जनसुनावणी घेत असते. परंतु, या संदर्भात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी जात नाहीत आणि आपले लोकप्रतिनिधीही त्याला विरोध करत नाहीत. यामुळे वीज वितरण कंपनीने सादर केलेला प्रस्ताव वीज नियामक आयोग सहजासहजी मंजूर करते आणि त्यामुळेच वीज वाढ केली जाते.' विक्रांत पाटील यांनी ग्राहकांना आव्हान केले: "ग्राहकांनी आता जागृत झाले पाहिजे. त्यांनी अशा जनसुनावण्यांच्या वेळी आपला जोरदार विरोध दर्शवला पाहिजे. तसेच, रस्त्यावरती लढाई करण्यासाठीही सज्ज झाले पाहिजे."
ते पुढे म्हणाले की, वीज वितरण कंपनी वीज बिलात वाढ करते, पण त्या प्रमाणात वीज सुधारणा (सेवा सुधारणा) करते का? हा खरा प्रश्न आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिले येणार आहेत आणि त्याला ग्राहकांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे.
प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकडेवारी सादर करून परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत.त्यापैकी ८६ हजार ग्राहकांचे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.विशेष म्हणजे, यापैकी एकाही ग्राहकाची परवानगी घेण्यात आलेली नाही.वेंगुर्लेकर यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत, त्यापैकी ७१ ग्रामपंचायतींनी स्मार्ट मीटरला विरोध करण्याचा ठराव घेतला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, वीज ग्राहक संघटना ग्राहकांच्या हितासाठी लढा देत आहेत, परंतु या संघर्षासाठी ग्राहकांनीही मानसिक तयारी ठेवण्याची गरज आहे.यावेळी प्राध्यापक सुभाष गोवेकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आणि उद्धटपणे देण्यात येणाऱ्या उत्तरांवर टीका केली. त्यांनी वीज कंपनीने कारभारात सुधारणा करावी, असे सांगत गेल्या काही वर्षांत वाढवलेल्या वीज बिलांची माहिती दिली. ग्राहक रवी जाधव यांनी आपल्या घरगुती आणि व्यावसायिक बिलातील वाढीव रकमेची तक्रार मांडली. यावर मोमीन यांनी त्यांना सविस्तर तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढ याविरोधात वीज ग्राहकांनी संघटित होण्याची गरज आहे, यावर जावेद मोमीन यांनी जोर दिला. त्यांनी दिवंगत नेते प्रताप होगाडे यांच्या कार्याचाही गौरव केला. होगाडे यांनी स्मार्ट मीटर बाबत अगोदरच धोक्याची सूचना दिली होती आणि ग्राहकांच्या हितासाठी अखेरपर्यंत लढा दिला. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे आश्वासन मोमीन यांनी यावेळी दिले.यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्कप्रमुख विक्रांत पाटील, जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर, पदाधिकारी बाळ बोर्डेकर, समीर शिंदे, प्राध्यापक सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते. तसेच, उल्हास सावंत, मनोज घाटकर, समीर वंजारी, दिलीप भालेकर, रमेश बोंद्रे, रूपाली पाटील, संतोष तावडे यांसह अनेक वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते