For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामान्य माणसांना आत्मस्वरूपाचा विसर पडतो

06:45 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सामान्य माणसांना आत्मस्वरूपाचा विसर पडतो
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

अज्ञानी माणसं स्वत:ला कर्ता समजत असतात. त्यामुळे ती अहंकारी झालेली असतात. अशी मंडळी सत्व, रज, तम गुणांच्या आहारी जाऊन झपाटल्यागत कामं करत असतात. त्यांच्यात त्रिगुणांच्यापैकी ज्या गुणाचे प्राबल्य असते. त्यानुसार वाट्याला आलेली कर्मे ते करत असतात. परंतु ज्ञानी मनुष्याला आत्मा हा वरील त्रिगुणांपेक्षा वेगळा आहे हे माहीत असतं. तसेच त्या त्या वेळेस ज्या गुणाचा जोर असेल त्याप्रमाणे हातून कर्मे घडणार ह्याचीही त्याला कल्पना असते. तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने प्रारब्धानुसार त्याचे शरीर जरी कर्म करत असले तरी तो त्यात आसक्त होत नाही. त्यासाठी त्याने प्रयत्नपूर्वक स्वत:च्या स्वभावातील रज आणि तम गुणाचे प्राबल्य कमी करून सत्वगुणाची वाढ केलेली असते. त्यामुळे तो करत असलेली कर्मे सात्विकच असतात. तसेच ती लोककल्याणकारी असतात. मात्र कर्माच्या फळांच्या अपेक्षेपासून तो दूर राहतो व ईश्वराचा आवडता होतो.

इथं एक महत्त्वाचा मुद्दा बाप्पा समजावून देताहेत तो असा की, पूर्वकर्मानुसार याजन्मीचा स्वभाव तयार होतो. त्या स्वभावानुसार हातून कर्मे होत असली तरी निरपेक्षतेनं ती जर तो करत असेल तर तो ईश्वराच्या समीप जाऊ शकतो. मात्र अशा फळापासून दूर राहणाऱ्या व्यक्तीनी फळाच्या अपेक्षेने कर्म करणाऱ्या व्यक्तींना कमी लेखून दूर लोटू नये असं बाप्पा पुढील श्लोकात सांगताहेत.

Advertisement

कुर्वन्ति सफलं कर्म गुणैस्त्रिभिर्विमोहिता ।

अविश्वस्त स्वात्मद्रुहो विश्वविन्नैव लंघयेत् ।। 29।।

अर्थ-तीन गुणांनी मोह पावलेले फलयुक्त कर्म करतात. आत्म्याचा द्रोह करणाऱ्यांना म्हणजे फलयुक्त कर्म करणाऱ्यांना स्वत: फलयुक्त कर्म न करणाऱ्या सर्वज्ञाने सोडून जाऊ नये.

विवरण- योगी मनुष्याला फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचं महत्त्व पटलेलं असतं परंतु अन्य व्यक्ती त्रिगुणांच्या मोहात पडून लिप्त होतात. साहजिकच त्यांना स्वत:च्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. एकप्रकारे ते आत्म्याचे अस्तित्वच नाकारत असल्याने त्यांनी आत्म्याशी द्रोह केल्यासारखे होते. म्हणून फळाच्या अपेक्षेने कर्म करणारी माणसे बघितली की, कदाचित योग्याला त्यांचा तिटकारा वाटू शकेल. अशा लोकांना बाप्पा सावध करताहेत म्हणतात, फळाच्या अपेक्षेने कर्म करणाऱ्या मंडळींचा तिरस्कार करू नका कारण त्यांचं उद्दिष्ट काहीही असलं तरी फळासाठी का होईना ते आळसात वेळ न घालवता कर्म करत आहेत हीच मोठी जमेची बाजू आहे. निक्रिय राहून आळसात वेळ घालवण्यापेक्षा, कर्म करणं हे कितीतरी चांगलं. यातूनच केव्हा ना केव्हा त्यांना निष्काम कर्म करण्याचं महत्त्व पटून जाईल हे नक्की आहे. आणखी एक म्हणजे, असं केल्याने मी निरपेक्षतेनं कर्म करतो असा अभिमान होण्यापासून ज्ञानी मनुष्य वाचतो.

पुढील श्लोकात बाप्पा शहाण्या माणसाने केलेले कर्म मला अर्पण करावे असे सांगत आहेत.

नित्यं नैमित्तिकं तस्मान्मयि कर्मार्पयेद्बुध ।

त्यक्त्वाहंममताबुद्धिं परां गतिमवाप्नुयात् ।। 30।।

अर्थ- म्हणून शहाण्या मनुष्याने नित्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे कर्म माझे ठिकाणी अर्पण करावे. अहंकार आणि ममत्वबुद्धि सोडून परमश्रेष्ठ अशी गती मिळवावी.

विवरण-प्रत्येक मनुष्याला ईश्वराने नित्य म्हणजे रोज करायची कामे आणि काही विशेष प्रसंगी करायची कामे अशी निरनिराळी कर्मे नेमून दिलेली असतात. त्याने ती कामे सांगितल्याप्रमाणे करून ईश्वराला अर्पण करावीत म्हणजे तो त्याच्या बंधनातून मुक्त होतो. त्याने त्याचे ह्या जन्मातील कर्तव्य निभावल्यासारखे होऊन केलेली कर्मे ईश्वराला अर्पण केल्याने तो त्यातील पाप पुण्याच्या प्रभावातून मुक्त झाल्याने त्याला पुनर्जन्म मिळत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.