बळ्ळारी कारागृहात दर्शनचे ‘सामान्य दर्शन’
कारागृह उत्तर विभागाचे डीआयजी टी. पी.शेष यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
बेळगाव : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणात कारागृहात असलेला चित्रपट अभिनेता दर्शनला सामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक द्यावी, सामान्य कैद्यांना ज्या सुविधा पुरविल्या जातात, त्या पुरवाव्यात. या व्यतिरिक्त विशेष काळजी घेऊ नये, अशी सूचना कारागृह विभागाचे उत्तर विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनी कारागृह अधिकाऱ्यांना केली आहे. गुरुवारी सकाळी दर्शनला बळ्ळारी कारागृहात हलवण्यात आले आहे. बेंगळूरहून बळ्ळारीला येताना दर्शनने किमती गॉगल घातला होता. त्याच्या हातात कडे होते. लाल दोरा बांधलेला होता. ही दृश्ये वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होताच टी. पी. शेष यांनी बळ्ळारी कारागृहातील अधीक्षकांना पत्र पाठवले असून बळळारीतही गैरप्रकार आढळून आल्यास थेट कारागृह प्रमुखांनाच जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दर्शनला स्वतंत्र कक्षात ठेवा
दर्शनला स्वतंत्र कक्षात ठेवावे. या कक्षावर चोवीस तास सीसीटीव्हीची नजर असावी. यासंबंधीची दृश्ये राखून ठेवावीत. दर्शनवर नजर ठेवण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. रोज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या बराकीला भेटी देऊन तेथील सुरक्षाव्यवस्था व त्याच्या चलनवलनाची पाहणी करावी. त्याच्या कक्षात आक्षेपार्ह वस्तू आढळणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना डीआयजींनी यावेळी केली आहे. दर्शनच्या बराकीबाहेर पहारा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बॉडीवॉर्न कॅमेरे परिधान करणे सक्तीचे आहे. त्याचे फुटेजही राखून ठेवावे. केवळ दर्शनची पत्नी, नातेवाईक व वकिलांनाच कारागृहाच्या नियमानुसार भेटीला सोडावे. राजकीय व्यक्ती किंवा चित्रपट क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्रींना भेटीची संधी देऊ नये. परप्पन अग्रहार कारागृहातील फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सरकार पातळीवर त्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दर्शनला विशेष सुविधा किंवा आदरातिथ्य देऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
कँटीन, मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून द्या
कारागृहाच्या नियमानुसार कँटीन, मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय दर्शन आपल्या बराकीतून बाहेर पडणार नाही. इतर कैद्यांबरोबर मिसणार नाही, याची काळजी घ्यावी. अचानकपणे बराकीला भेट देऊन पाहणी करावी. भेटीसाठी येणाऱ्या कुटुंबीयांचीही केएसआयएएसएफच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी. दर्शनचे चाहते कारागृहाबाहेर गर्दी करणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक बंदोबस्त करण्याची सूचनाही टी. पी. शेष यांनी बळ्ळारी कारागृहाच्या अधीक्षकांना केली आहे.