For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

10:33 PM Jul 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
Advertisement

त.भा. प्रतिनिधी,मुंबई, धाराशिव जिह्यातील श्री. तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अहिल्यानगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत.

Advertisement

या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तुळजाभवानी देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिराला 4 हजार 820 एकर जमीन निजामाकडून देणगी म्हणून आली. सदर जमिनीची खरेदी‚विक्री होऊ शकत नाही. असे असताना सुद्धा महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने खासगी व्यक्तींना तिचे वाटप करण्यात आले.

Advertisement

देवस्थानच्या नावे 3 हजार 397 एकर जमीन असताना प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मात्र काही खासगी व्यक्तींच्या नावे देण्यात आला, असा आरोप आहे.

जगदंबा न्यासाच्या नावे असलेली 403 एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट जमीन खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. अव्वल कारकून यांनी अधिकाराचा गैरवापर करून 261 एकर जमीन खासगी व्यक्तींच्या नावे केल्याचे मुद्दे यावेळी चर्चेला आले होते. या सर्व मुद्द्यांची चौकशी समितीकडून केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.