बीडीसीसी बँकेच्या हितासाठी कटिबद्ध
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे प्रतिपादन : तालुक्यातील प्राथमिक कृषी पत सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (बीडीसीसी) हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील दिवसांत शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन अरभावीचे आमदार व बेमुलचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी केले. बीडीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील एका हॉटेलमध्ये बेळगाव तालुक्यातील प्राथमिक कृषी पत सहकारी संघाच्या (पीकेपीएस) पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. 12) बैठक झाली. यामध्ये आमदार जारकीहोळी बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगोडे, युवानेते राहुल जारकीहोळी, बँकेचे संचालक कृष्णा अनगोळकर, शंकरगौडा पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून आम्ही कार्य करू. बेळगाव तालुक्यातील सर्व पीकेपीएसना बँकेकडून अधिक प्रमाणात मदत मिळावी. शेतकऱ्यांना शून्य व्याज दराने कर्ज मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट जाणून घेणारा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा करण्यात येईल. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आम्ही एकत्र येऊन योग्य उमेदवार देणार आहोत. बेळगाव तालुक्यातील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर अखेरच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव तालुक्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे आमदार जारकीहोळींनी सांगितले.
10 हजार कोटींच्या ठेवी मिळविण्याचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. बँकेत 10 हजार कोटींच्या ठेवी मिळविणे व 5 हजार कोटीपर्यंत शून्य व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान कर्ज वितरण करण्यात येईल. बीडीसीसी बँक शेतकऱ्यांची असून शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये. आमच्याकडे सत्ता येईलच. जिल्हा दूध महासंघाला मागील दोन वर्षांत जसा लाभ मिळाला आहे तसा बँकेलाही मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत, असेही ते म्हणाले. बेळगाव तालुक्यातून निवडणूक बिनविरोध केल्यास इतर तालुक्यांना आम्ही आदर्श ठरू. अनेक जणांना बेळगाव तालुक्यातील राजकारणाचे कुतूहल असते. मंत्री, आमदार, सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून बेळगाव तालुक्यातील टीएपीसीएमएसच्या सर्व जागा बिनविरोध निवडून आणल्या असून हे प्रगतीच्या दिशेने पाऊल असल्याचे सिद्ध झाले आहे, असे चन्नराज हट्टीहोळी म्हणाले. प्रारंभी संचालक राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.