आयोगाची 20 राज्यांमध्ये विशेष मोहीम
‘एसआयआर’मध्ये वगळलेली नावे अन् नवीन मतदार पडताळणीअंती समाविष्ट करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून लाखो लोकांची नावे वगळण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, 20 राज्यांमध्ये ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. ज्या भागांमध्ये मतदार यादी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, तेथील ‘वगळलेल्या’ आणि 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांचा तात्काळ समावेश करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
निवडणूक आयोगाने अलीकडेच नवीन मोहीम सुरू करण्यासंबंधी निर्देश लेखी स्वरूपात जारी केला. यासंबंधी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याचा पुनरुच्चार करण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसरा टप्पा 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. यापैकी सात राज्यांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, निवडणूक आयोगाने तिसऱ्या टप्प्यासाठीच्या सात राज्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. महाराष्ट्रात सर्वाधिक नावे वगळण्यात आली असून, 2 कोटी लोकांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे.
वगळलेल्या नावांचीही सखोल चौकशी
आयोगाने ‘ईसीआयनेट’चा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या समितीत ‘आयआयटी’ किंवा ‘आयआयआयटी’मधील एका स्वतंत्र तज्ञाचा समावेश असेल. सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल केले जातील. ‘एसआयआर’पूर्वी आणि नंतरच्या मतदारयाद्यांची तुलना करून चुकून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांना ओळखण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करेल. संबंधित व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी बीएलओ घरोघरी भेट देतील. नाव दुबार किंवा मृत व्यक्तीचे नसल्याचे आढळल्यास, फॉर्म 6 वापरून नाव पुन्हा समाविष्ट केले जाईल. या प्रक्रियेत राजकीय पक्ष आणि बूथ-स्तरीय एजंट यांचाही सहभाग असेल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.
आयोगाकडून बीएलओंना सूचना
निवडणूक आयोगाने बूथ लेव्हल ऑफिसर्सना (बीएलओ) सध्याच्या मतदार यादीची ‘एसआयआर’ पूर्वीच्या यादीशी तुलना करून ज्या मतदारांची नावे पूर्वी यादीत होती परंतु अंतिम यादीतून वगळण्यात आली होती, अशा मतदारांना ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी बीएलओ घरोघरी जाऊन पडताळणी करतील. प्रत्येक अधिकाऱ्याला दर आठवड्याला 20 ते 25 मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. ही पडताळणी मोहीम एका महिन्यात पूर्ण होईल. बीएलओ नव्याने पात्र ठरलेल्या तरुण मतदारांकडून आणि खरोखरच यादीतून वगळलेल्या मतदारांकडून फॉर्म 6 चे अर्ज जागेवरच गोळा करतील. पारदर्शकता राखण्यासाठी ही यादी त्यानंतर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्सना (बीएलए) थेट दिली जाईल. एसआयआरच्या निर्णयांवरून निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेणार
महाराष्ट्रामध्ये एसआयआर अजूनही सुरू आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव घाईने वगळू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील अधिकाऱ्यांना कागदपत्रे आणि माहितीची सखोल पडताळणी केल्यानंतरच नावे वगळण्याचा निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. नोटिसा मिळालेल्यांसाठी 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरेही आयोजित केली जातील. महाराष्ट्राच्या मसुदा मतदार यादीतील सुमारे 1.22 कोटी नोंदी पडताळणीसाठी ओळखण्यात आल्या आहेत. यापैकी, सुमारे 62.48 लाख प्रकरणांमध्ये नातेवाईकांच्या माहितीत त्रुटी आहेत आणि सुमारे 59.75 लाख प्रकरणांमध्ये मागील मतदार यादीतील नातेवाईकांशी जुळत नसल्याची प्रकरणे आहेत. पात्र मतदारांना यादीतून वगळू नये आणि त्यांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण केले पाहिजे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.