जन्म-मृत्यू विभागात आयुक्तांची अचानक धाड, कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीही खरडपट्टी
दाखल्यांसाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांनी पुन्हा आयुक्तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
मिरज : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचा कारभार ढेपाळल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पडत असल्याने सोमवारी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वसुचना न देता महापालिकेच्या जन्म - मृत्यू विभागात अचानक धाड टाकली. आयुक्त आल्याचे पाहून कर्मचारीही गोंधळून गेले. दाखल्यांसाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांनी पुन्हा आयुक्तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
आयुक्तांनी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन दाखले वितरणाच्या कासवगती प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. जनतेची कामे तातडीने करा, असे निर्देशही दिले. महापालिकेकडून ४० प्रकारच्या विविध ऑनलाईन सुविधा सुरू करीत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेचे ऑनलाईन पोर्टल बंद झाल्याने जन्म-मृत्यू दाखले वितरणाची प्रक्रिया ढेपाळली आहे.
महापालिकेत अर्जदार नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मागील आठवड्यात 'दैनिक तरुण भारत संवाद'ने याबर आवाज उठविला होता. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना दाखल्यांसाठी रांगेत थांबावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सुमारे दीड हजार दाखले प्रलंबित असल्याने अनेक नागरिकांची कामे रेंगाळली होती. आयुक्तांनी याची दखल घेऊन तातडीने वेब पोर्टल सुरू करण्यासह आठवडाभरात सर्व दाखल्यांचे वितरण करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, महापालिका जन्म-मृत्यू विभागाच्या कामकाजात कोणताही बदल झाला नव्हता.
नागरिकांना टोकनसाठी रांगेत ताटकळत थांबावे लागत होते. एका टोकनसाठी किमान पंधरा मिनीटांचा वेळ लागत असल्याने रांगेत थांबूनही अनेक नागरिकांना टोकनही मिळत नव्हते. त्यामुळे संबंधीत अर्जदारांनी थेट आयुक्तांकडे तक्रारी सुरू केल्या होत्या. महापालिकेची ऑनलाईन सुविधा बंद करुन ऑफलाईन दाखल्यांसाठी नागरिकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केला जात होता. स्थानिक पातळीबर तक्रारदारांचे निरसन न करता कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तक्रारदारांनी सांगली महापालिकेत जावून आयुक्तांकडे तक्रारी केल्या.
सोमवारी आयुक्तांनी महापालिकेच्या जन्म– मृत्यू विभागात अचानक एन्ट्री केली. आयुक्त आल्याचे पाहून कर्मचारीही गोंधळून गेले. आधीच रांगेत अर्जदार थांबले होते. आयुक्त येताच कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. आयुक्तांनी तक्रारदार नागरिकांशी चर्चा केली. दाखले वेळेत व सुलभ पध्दतीने मिळतात का? अशी विचारणा केली. यावेळी पुन्हा नागरिकांनी तक्रारींचा पाढा सुरू केल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यांनी जन्म– मृत्यू विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. नागरिकांना कोणत्याही पध्दतीचा त्रास न देता तातडीने दाखले वितरण करावे, असे निर्देश दिले. आयुक्तांनी विवाह नोंदणी विभाग, नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, घरपट्टी विभागातही पाहणी करुन कामकाजाचा आढाव घेतला. नागरिकांना घरबसल्या महापालिकेच्या सुविधा मिळविण्यासाठी करसंकलनासह नागरी सेवेंतर्गत ४० प्रकारच्या विविध ऑनलाईन सुबिधा सुरू करीत असल्याचे सांगितले.
लोकसेवा कायद्याची अंमलबजावणी करा
महापालिकेत आयुक्तांनी स्टींग ऑपरेशन करण्यासह सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगल्या कार्यपध्दतीविषयी मार्गदर्शनही केले. लोकसेवा हक्क कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण करुन देत लोकहित जोपासून कर्मचाऱ्यांनी लोकसेवा करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन केले. त्यानंतर सभागृहात सर्व कर्मचाऱ्यांसह छोटेखानी कार्यक्रम घेऊन सर्वांना सेवा हक्क बाबतची शपथ दिली. उपायुक्त शिल्पा दरेकर, विजया यादव, वैभव साबळे, स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहा. आयुक्त सहदेव कावडे, मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनबे, अभिजित मेंगडे, धनंजय जाधव, अशोक माणकापुरे, संगय्या मठद व कर्मचारी उपस्थित होते.