घोड्याच्या चौकशीसाठी आयोग
विविध प्रकारांच्या चौकशांसाठी आयोग नेमले जातात, हे आपल्याला माहीत आहे. विशेषत: काही घोटाळा अगर अपहार घडल्यास त्यामागचे सत्य शोधून काढण्यासाठी चौकशी आयोग स्थापन केला जाणे, ही नित्याचीच बाब आहे. चौकशी आयोग मानवाने केलेल्या कृत्यांसाठी नेमले जातात, ही बाबही स्पष्ट आहे. तथापि, एका प्राण्याच्या चौकशीसाठी आयोग नेमला जाणे ही बाब आपल्याला अद्भूत वाटल्याशिवाय राहणार नाही. पण तशी घटना जर्मनी या देशात झाली.
या देशात एक रशियन ट्रोंट जातीचा एक घोडा 20 व्या शतकाच्या प्रारंभी, अर्थात साधारणत: सव्वाशे वर्षांपूर्वी होता. अत्यंत बुद्धीमान म्हणून त्याची ख्याती होती. प्राण्यांमध्ये प्रामुख्याने हत्ती, श्वान आणि अश्व (घोडा) हे तीन प्राणी बुद्धीमान म्हणून मानले जातात. त्यांच्या बुद्धीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. हा घोडा ‘क्वेव्हर हन्स’ या सार्थ नावानेच ओळखला जात होता. त्याची बुद्धीमत्ता जवळपास मानवासारखी असल्याचे मानले जात होते. आजही त्याची ख्याती चर्चिली जाते. हा घोडा त्याला पाहण्यासाठी येणाऱ्या माणसांची गणना करु शकत असे. किती लोक आले, हे तो आपल्या खुरांच्या टापा वाजवून दर्शवत असे. त्याला उजवी बाजू आणि डावी बाजू यातील अंतर कळत असे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे ‘होय’ किंवा ‘नाही’ अशा पद्धतीने माहीत होती. तो आपली मान विशिष्ट प्रकारे हलवून होय किंवा नाही, असे उत्तर देत असे. त्याला पहावयास येणाऱ्या लोकांना तो आपल्या या बौद्धीक क्रियाकलापांनी थक्क करीत असे.तसेच त्याला दिनदर्शिकाही (कॅलेंडर) ज्ञात होते, अशी त्याची प्रसिद्धी त्याकाळात झाली होती. अन्य घोड्यांच्या तुलनेत त्याची बुद्धीमत्ता अनन्यसाधारण मानली जात होती. त्याची ख्याती त्यावेळच्या राजाच्या कानावर गेली. त्याचा विश्वास बसला नाही. या अश्वासंबंधी जे बोलले जाते, ते खरे आहे की नाही, हे पाहण्यासाठी एका चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली.