‘नोएडा’तून 15 जूनपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 जून 2026 पासून विमानसेवा सुरू होणार आहे. दिल्लीजवळ जेवर येथे विकसित केलेले हे अत्याधुनिक विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील वाढती हवाई वाहतूक हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. तसेच प्रवाशांना नवीन सुविधा व सुधारित कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनानुसार, इंडिगो येथून पहिले प्रवासी विमान चालवेल. त्यानंतर अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस देखील लवकरच सेवा सुरू करतील, अशी माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मागील महिन्यात विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. आता नागरी हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोकडून एअरड्रोम सुरक्षा कार्यक्रम मंजुरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे. ही मंजुरी विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, प्रणाली आणि कार्यपद्धती सर्व नियामक मानकांनुसार असल्याची पुष्टी देते.