व्यापारी आस्थापनांकडून बेसमेंटमध्ये वाहन पार्किंग करणे बंधनकारक
बेंगळूर, म्हैसूरच्या धर्तावर बेळगावात सुरू करणार ट्रॅफिक वॉर्डन सिस्टम
बेळगाव : शहरातील रहदारी आणि पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलीस खात्याकडून प्रयत्न सुरू आहे. याला व्यापारी, ऑटो रिक्षाचालक व बसचालकांचे सहकार्य गरजेचे आहे. शहरात ज्या व्यापारी आस्थापनाकडून बेसमेंटमध्ये वाहने पार्क केली जात नाही. त्याची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. भविष्यात संबंधितांनी बेसमेंटऐवजी रस्त्यावर वाहने पार्क केल्यास नोटीस बजावून दंडात्मक कारवाई केली जाईल. बेंगळूरमध्ये ट्रॉफिक वॉर्डन्स सिस्टम कार्यरत आहे. त्याचप्रमाणे बेळगावातही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले. बहुतांश व्यापारी आस्थापनाकडून बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी केला जात नाही. त्यामुळे भविष्यात संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे.
यापूर्वी शहरातील शैक्षणिक संस्थांना विनंती केली होती. त्याचप्रमाणे आता मॉल चालकांना विनंती करणार आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. रस्त्याच्या कडेला पांढरे पट्टे ओढण्यासंदर्भात मनपाला विनंती केली जाणार आहे. पार्किंग किंवा बैठ्या विक्रेत्यांनी त्या पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसून व्यापार केला पाहिजे. पोलीस आपले काम करत आहेत. मात्र जनतेनेही सहकार्य करणे गरजेचे आहे. म्हैसूर, बेंगळूरमध्ये ट्रॅफिक वॉर्डन योजना आहे. तेथे नागरिकही रहदारी व्यवस्थापनाचे काम करतात. याच धर्तीवर बेळगावातही ट्रॅफिक वॉर्डन सिस्टीम सुरू केली जाणार आहे. बहुतांशजण ट्रॉफिक वॉर्डन म्हणून काम करण्यास पुढे येतात. त्यांना रिप्लेक्टर्स जॅकेट व टोपी दिली जाईल.