कमर्शियल सिलिंडर 62 रुपयांनी महाग
घरगुती सिलिंडरचे दर स्थिर, विमान इंधन महागले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीच्या सणानंतर लगेचच तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी देशभरातील व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. आता सुधारित दरांनुसार 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी वाढविली आहे. तथापि, 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,740 रुपये होती. आता ही किंमत 1,802 रुपये झाली आहे. 5 किलो वजनाच्या फ्री टेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 15 रुपयांनी वाढ झाल्याने छोट्या सिलिंडरवरही या सुधारणांचा परिणाम होतो. सुधारित दरांची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू झाली आहे. या किमती समायोजनामुळे व्यावसायिक आस्थापने आणि लहान व्यवसायांवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक एलपीजीच्या दरात ही सलग चौथी मासिक वाढ आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 48.50 रुपयांनी वाढवल्या होत्या. त्याआधी 1 ऑगस्टला 6.50 रुपये प्रतिसिलिंडर आणि 1 सप्टेंबरला 39 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
विमानाच्या इंधन दरातही वाढ
सरकारी मालकीच्या इंधन किरकोळ विव्रेत्यांनुसार विमानासाठीच्या इंधनामध्येही (एटीएफ) वाढ करण्यात आली आहे. एटीएफची किंमत 2,941.5 रुपये प्रतिकिलोलिटर किंवा 3.3 टक्क्यांनी वाढून 90,538.72 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. यापूर्वी दर कपातीच्या दोन फेऱ्यांनंतर ही दरवाढ झाली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी एटीएफच्या किमतीत 6.3 टक्के (5,883 रुपये प्रतिकिलो) आणि 1 सप्टेंबर रोजी 4,495.5 रुपये प्रतिकिलो किंवा 4.58 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. मुंबईतील एटीएफ दर शुक्रवारी 81,866.13 रुपयांवरून 84,642.91 रुपये प्रतिकिलोलिटर झाला.