कमर्शियल सिलिंडर महागला
फ्री ट्रेड एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. हा बदल लोकांच्या खिश्यावरील भार वाढविणारा आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत 48.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 5 किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढीव किंमत 1 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. 14 किलो वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कुठलाच बदल करण्यात आलेला नाही.
जुलै महिन्यात कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत 30 रुपयांची घट करण्यात आली होती. तेल कंपन्यांनी त्यापूर्वी एप्रिलमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर स्वस्त केला होता. तर एक मार्च रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली होती. तेव्हा 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढविण्यात आली होती.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पेरेशन लिमिटेड दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात. किमतीतील चढउतार हे इंधनाचा खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतात.