For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर दरात 195 ते 218 रुपये वाढ

06:22 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर दरात 195 ते 218 रुपये वाढ
Advertisement

घरगुती सिलिंडर दरात कोणताही बदल नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कंपन्यांनी बुधवारी कमर्शियल (व्यावसायिक) एलपीजीच्या दरात 195.50 ते 218 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या सिलिंडरसाठी लागू झाली आहे. तथापि, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. घरगुती एलपीजी गॅसचे दर पूर्वीप्रमाणेच राहिल्याने गृहिणींना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

Advertisement

व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील ही वाढ पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,078.50 झाली आहे. चेन्नईमध्ये ही किंमत 2,246.50 या सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोग्रॅम सिलिंडरच्या दरात 114.50 ने वाढ केली होती.

दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण देताना व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सरकारद्वारे निश्चित केल्या जात नाहीत, तर त्या बाजारपेठेवर आधारित असतात आणि साधारणपणे दर महिन्याला बदलतात, असे सांगितले. देशातील एकूण एलपीजी वापरामध्ये त्यांचा वाटा 10 टक्केपेक्षा कमी आहे. तथापि, सरकारने घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विनिमय दरांच्या आधारावर दर महिन्याच्या 1 तारखेला एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि एलपीजीच्या किमती निश्चित करत असतात.

परिणाम : व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंट मालकांचा खर्च वाढेल. परिणामी, ते चहा, नाश्ता आणि जेवणाच्या थाळीच्या दरात वाढ करू शकतात. लग्नसमारंभातील केटरिंगदेखील महाग होऊ शकते.

मोठ्या शहरांमधील कमर्शियल गॅस सिलिंडर्सचे दर

शहर                     नवे दर                  जुने दर                 फरक/वाढ

दिल्ली                 2,078.50             1,883.00             195.50

कोलकाता            2,208.00             1,990.00              218

मुंबई                 2,031.00              1,835.00              196

चेन्नई                2,246.50             2,043.50              203

Advertisement
Tags :

.