व्यावसायिक सिलिंडर दरात 10 रुपये कपात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. हा बदल सोमवार, 1 डिसेंबरपासून लागू झाला. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना किंचित दिलासा मिळाला आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्येही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 5 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तथापि, 14.2 किलो वजनाच्या म्हणजेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सुधारित दरांमुळे राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1,580.50 रुपये आहे. पूर्वी ती 1590.50 रुपये होती. तथापि, सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत शेवटची 8 एप्रिल रोजी बदलण्यात आली होती. दिल्लीत सामान्य ग्राहकांसाठी त्याची किंमत 853 रुपये आहे.