For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमर्शियल सिलिंडर 60 ते 71 रुपयांनी महाग

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कमर्शियल सिलिंडर 60 ते 71 रुपयांनी महाग
Advertisement

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर : गृहिणींना दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

ऑक्टोबर महिना सुरू होताच महागाईचा धक्का बसला आहे. सणासुदीच्या दिवसांपूर्वी गुरुवार, 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरकर्त्यांना महागाईचा फटका बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 19-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत वेगवेगळ्या शहरात 60 ते 71 रुपयांपर्यंत वाढवली आहे. तथापि, घरगुती सिलिंडरच्या दरात तूर्तास कोणताही बदल न झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

दिल्लीत गुरुवारपासून व्यावसायिक सिलिंडडरची किंमत 62.50 रुपयांनी वाढून 2,810 रुपये झाली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 9.50 रुपयांनी वाढून 2,747.50 रुपये झाली होती. आता, ऑक्टोबरच्या सुरुवातीला आणखी एक लक्षणीय दरवाढ झाली आहे. कोलकातामध्ये ही वाढ 70 रुपये आहे. मुंबईत कमर्शियल सिलिंडर 2,764.50 रुपये आणि चेन्नईत 2,983 रुपयांवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग व्यवसायांच्या खर्चावर होऊ शकतो.

देशभरातील विविध शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 71.50 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये सिलिंडर 60 रुपयांनी, तर काहींमध्ये 66 रुपयांनी आणि इतर शहरांमध्ये 71.50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. तथापि, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मात्र स्थिर आहे. याचा अर्थ, घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरची किंमत तीच राहिली आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 942 रुपये, मुंबईत 941.50 रुपये आणि चेन्नईत 957.50 रुपये आहे. तसेच पाटण्यात त्याची किंमत 1,031.50 रुपये आणि लखनौमध्ये 979.50 रुपये आहे.

ई-केवायसी न केल्यास एलपीजी अनुदान नाही

1 ऑक्टोबर 2026 पासून ग्राहकांना अनुदानित दरात एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (बीएए / ई-केवायसी) पूर्ण करणे अनिवार्य असेल. ज्यांच्याकडे आधीपासून ई-केवायसी आहे त्यांच्यासाठी कोणताही बदल होणार नाही. ज्या ग्राहकांनी बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केलेली नाही, त्यांना अनुदानित दरात गॅस बुक करता येणार नाही. तथापि, गॅस सिलिंडरचा पुरवठा किंवा बुकिंग थांबवले जाणार नाही. ग्राहकांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केल्यावर त्यांना अनुदानित दरात सिलिंडर मिळणे पुन्हा सुरू होईल.

Advertisement
Tags :

.