भारतात निर्माण होणार व्यापारी विमाने
रिलायन्स आणि देसाँ कंपन्यांमध्ये महत्वाचा करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात लवकरच फाल्कन 2000 या जातीच्या व्यापारी विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. यासंबंधी भारताचा रिलायन्स उद्योगसमूह आणि फ्रान्सची जगप्रसिद्ध देसाँ कंपनी यांच्यात महत्वाचा करार झाला आहे. ही विमाने 2028 पासून उत्पादित केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या विमानांचा उपयोग वायुसेना आणि व्यापारी कंपन्या यांच्यासाठी होणार असल्याची माहिती आहे.
रिलायन्स समूहाची एक उपकंपनी असणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने देसाँ कंपनीशी यासाठी हातमिळवणी केली आहे. ही घोषणा या दोन्ही कंपन्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली बुधवारी करण्यात आली. भारतात या दोन्ही कंपन्या व्यापारी आणि युद्धोपयोगी अशा दोन्ही प्रकारांच्या विमानांचे उत्पादन करतील, असे या दोन्ही कंपन्यांकडून संयुक्तरित्या स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये होणार उत्पादन केंद्र
लवकरच या दोन्ही कंपन्या संयुक्तरित्या महाराष्ट्राच्या नागपूर येथे या विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन आणि जुळणी करण्यासाठी एका उत्पादन केंद्राची स्थापना करणार आहेत. अशा प्रकारे देसाँ कंपनी प्रथमच आपल्या विमानांचे उत्पादन फ्रान्स बाहेरच्या देशात करणार आहे. या उत्पादन केंद्रातून प्रथम विमान 2028 पर्यंत बाहेर पडणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारताला लाभ
या कराराचा भारताला मोठा लाभ होईल, अशी शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भारतात रोजगार निर्मिती होईल. तसेच भारताची अशा प्रकारच्या विमानांची आवश्यकता भारतातच पूर्ण होईल. कालांतराने ही विमाने उत्पादित करण्याचे तंत्रज्ञानही भारतीय तंत्रज्ञ आत्मसात करण्याची शक्यता आहे. पूर्णत: भारतनिर्मिती युद्ध विमानाची निर्मिती करण्याचे प्रयत्न भारताकडूनही होत आहेत. या प्रयत्नांना या संयुक्त प्रकल्पाचा हातभार लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अद्याप सविस्तर माहिती नाही
या संयुक्त प्रकल्पाविषयी अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लवकरात लवकर उत्पादनाचा प्रारंभ करण्याविषयी भारत आग्रही आहे. भारत वेगाने आपल्या सेनादलांचे अत्याधुनिकीकरण करत आहे. या अभियानाचा एक महत्वाचा भाग म्हणून या संयुक्त प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.