For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी भागात उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ

10:37 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी भागात उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ
Advertisement

मिरची हे या भागातील प्रमुख नगदी पीक : तालुक्याच्या पश्चिम भागात लागवड मोठ्या प्रमाणात : मिरची पिकाला सरकारने हमीभाव जाहीर करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

भात मळणी व इतर सुगीची कामे आटोक्यात आल्यामुळे जांबोटी भागातील शेतकरी वर्गांनी आता उन्हाळी मिरची लागवडीला प्रारंभ केला आहे. अनेक गावांमधील शेतवडीमध्ये आता शेतकरी वर्ग मिरची लागवड करताना दिसत आहेत. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, निलावडे, मुघवडे, आंबोळी, आमटे, कालमणी, हब्बनहट्टी, तोराळी, गोल्याळी तसेच नेरसा, शिरोली परिसरातील शेतकरी शेतवडीमध्ये भात कापणीनंतर उन्हाळी मिरची लागवड (गि•ाr मिरची) मोठ्या प्रमाणात करतात. मिरची हे या भागातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकासाठी तालुक्याच्या पश्चिम भागात अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकरी वर्ग भात कापणी व मळणीच्या कामानंतर मलप्रभा नदीकाठ, तसेच कारगिल नाला, भांडुरा नाला परिसर व उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतवडीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. त्यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. पूर्वी साधारणपणे जानेवारी महिन्यात मिरची लागवड करण्यात येत होती. परंतु मे, जून महिन्यात होणाऱ्या पावसामुळे मिरची सुकविण्यासाठी समस्या उद्भवत असल्याने गेल्या सात-आठ वर्षापासून नोव्हेंबर अखेरीपासून या भागात मिरची लागवड करण्यात येत आहे.

Advertisement

नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी लागवड

साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी मिरची लागवडीसाठी आवश्यक असलेल्या तरुची पेरणी करण्यात येते. तरु उगवण झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर मिरची रोप लागवडीसाठी योग्य झाल्यानंतर शेतकरी वर्ग मिरची शेतवडीत मशागत करतो.तसेच शेणखत व रासायनिक खतांचा वापर करून शेतवडीत मिरची रोपांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी वाफे बनवून त्यामध्ये मिरची रोपांची लागवड करण्यात येते. मिरची लागवड केल्यानंतर त्याची दोन ते तीन वेळाअंतर्गत कोळपणीची कामे करून मिरची रोपांच्या वाढीसाठी किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी देण्यात येते. साधारणपणे मार्च महिन्यापासून मिरची पिकाच्या फळ धारणेला प्रारंभ होतो. मिरची पिकल्यानंतर तिची तोडणी करून कडक उन्हात सुकविल्यानंतर ती विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. मिरची उत्पादनाचा हंगाम एप्रिल-मे महिन्यात ऐन बहरात असतो.

अनेक कारणांमुळे उत्पादनात घट

मिरची लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे या भागातील महिला वर्गांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होते.  खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात उत्पादित करण्यात आलेल्या उन्हाळी मिरची (गि•ाr मिरची) मध्ये नैसर्गिक तीव्र तिखट गुणधर्म असल्यामुळे गोवा तसेच कोकण किनारपट्टी प्रदेशात या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. एप्रिल महिन्यापासून गावोगावी मिरची व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी दाखल होतात. त्यामुळे मिरची लागवडीपासून शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळतो. परंतु मिरची पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रोपांची वाढ खुंटणे, जंगली प्राण्यांपासून नुकसान यासारख्या कारणांमुळे उत्पादनात घट होते. तसेच एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या वळीव पावसामुळे तोडलेली मिरची सुकवणे अशक्य होत असल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो.

यावर्षी लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता

मागीलवर्षी मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र मागणीमध्ये घट झाल्यामुळे मिरची खरेदी दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. तसेच मिरची विक्रीतून उत्पादन खर्च देखील मिळू शकला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी उत्पादीत केलेली मिरची घरीच साठवून ठेवल्यामुळे यावर्षी मिरची लागवड क्षेत्रात कांही प्रमाणात घट झाली आहे. मिरची हे या भागातील प्रमुख नगदी पीक असल्याने त्यापासून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळत असल्याने सरकारने मिरची पिकाला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Advertisement
Tags :

.