पंतप्रधान मोदी यांच्या अनुष्ठानांना प्रारंभ; भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता सज्जता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अयोध्येत रामजन्मभूमीस्थळी निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिरात भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा समय आता अवघ्या 9 दिवसांवर येऊन ठेपला आहे. ही प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2024 या दिवशी दोन प्रहरी 12 वाजून 20 मिनिटांनी केली जाणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाची पूर्वसज्जता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठानांना प्रारंभ केला आहे.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी आपण काही धार्मिक विधी आणि अनुष्ठाने पूर्ण करणार आहोत, अशी माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या अनुष्ठानांना शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. भगवान रामलल्लांच्या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मीही एक साक्षीदार होणार आहे. ही संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. प्रभू रामचंद्रांनीच मला सर्व भारतीयांच्या वतीने या सोहळ्यासाठी एक ‘साधन’ म्हणून निवडले आहे, अशी माझी भावना आहे. या पवित्र कार्यासाठी मी सर्व देशवासियांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधणेही मला अवघड होत आहे. पण मी प्रयत्न केला आहे, अशी भावोत्कट प्रतिक्रिया त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर शुक्रवारी सकाळी व्यक्त केली आहे.
‘यम नियमां’चे करणार पालन
शुक्रवारपासून 11 दिवसांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या 11 दिवसांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मशास्त्रानुसार आवश्यक असणाऱ्या ‘यम नियमां’चे पालन करणार आहेत. योगशास्त्राप्रमाणे जे यम नियम आवश्यक आहेत, त्यांचे पालन ते करणार आहेत. या शास्त्राप्रमाणे ‘यम’ पाच असून ते अहिंसा, सत्याचरण, अस्तेय, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह हे आहेत. ‘नियम’ हे ही पाच असून ते आंतर्बाह्या स्वच्छता, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे आहेत. या यमनियम पालनाचा प्रारंभ त्यांनी महाराष्ट्रातील पंचवटीपासून केला आहे.
पंचवटीचे महत्त्व
पंचवटी येथे प्रभू रामचंद्र, माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवासातील बराचसा कालावधी व्यतीत केला होता. त्यामुळे हे स्थान प्रभू रामचंद्रांच्या जीवनकाळात सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ते एक मोठे तीर्थस्थळ आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीर्थस्थळाला भेट देऊन तेथे स्वच्छता कार्यात स्वहस्ते सहभाग घेतला. त्यांनी या तीर्थक्षेत्री प्रार्थना आणि अनुष्ठानही केले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी स्वत:मध्ये एक आध्यात्मिक शक्ती जागृत झाल्याचा अनुभव येणे आवश्यक आहे. म्हणून आपण या पवित्र तीर्थस्थळी आलेलो आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
‘आनंदाला नाही सीमा’
भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार, याचा अवर्णनीय आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करण्यासाठी या क्षणी मला शब्दही सुचत नाहीत. या उदात्त भावना शब्दांमध्ये व्यक्त करणे अशक्यप्राय होत आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
‘घराघरांमधून दिवाळी साजरी करा’
भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठादिनी भारतवासियांनी त्यांच्या घरांमधून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच केले आहे. तर शुक्रवारच्या त्यांच्या संदेशात त्यांनी आपण स्वत: व्यक्तिगत स्वरुपात या कार्यक्रमासाठी कसे सज्ज होत आहोत, याची माहिती देशवासियांना दिली आहे. यमनियमांचे पालन करणे ही कोणाच्याही संयमाची आणि निर्धाराची परीक्षा असते. त्यांचे पालन हे सर्वात कठीण अनुष्ठान असते. ही एकप्रकारची तपसाधनाच आहे, असे मत योगक्षेत्रातील अनेक विद्वान आणि तज्ञांनी व्यक्त केले आहे.
यमनियमांचे पालन करणार
ड योगशास्त्रातील यमनियमांचे पालन पंतप्रधान मोदी यांच्याकडून केले जाणार
ड महाराष्ट्रातील नाशिक येथील पंचवटीपासून त्यांच्या अनुष्ठानांना झाला प्रारंभ
ड पंचवटी येथे शुक्रवारी तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेत पंतप्रधान मोदी यांचा सहभाग
ड भगवान रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला दुपारी 12.20 ला