सांबरा रेल्वेस्थानकावर नवीन गुड्सशेडची सुरुवात
भविष्यात मिळणार जंक्शनचा दर्जा : विविध सुविधांची सोय, देसूर येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेले गुड्सशेड आता सांबरा येथे हलविणार
बेळगाव : बेळगावजवळील सांबरा रेल्वेस्थानकात नवे गुड्सशेड सुरू करण्यात आले आहे. देसूर येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेले गुड्सशेड आता सांबरा येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे सिमेंट, मीठ, खडी, खत, तांदूळ यासह इतर खाद्यपदार्थांचे कंटेनर सांबरा रेल्वेस्थानकात उतरू लागले आहेत. यामुळे सांबरा रेल्वेस्थानकाचा विस्तार करण्यात आला असून भविष्यात हे मोठे रेल्वेस्थानक होण्याची चिन्हे आहेत. बेळगाव रेल्वेस्थानक शहराच्या मध्यभागी असल्याने त्याचा विस्तार करणे शक्य नाही. त्यामुळेच 1 नोव्हेंबर 2019 ला बेळगावमधील गुड्सशेड देसूर रेल्वेस्थानकात हलवण्यात आले.
बेळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी रेशनचा तांदूळ, सिमेंट यासह इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणात ने-आण असते. तसेच खाद्यपदार्थांचे गोडावून असल्यामुळे रेल्वेतून आलेले सर्व धान्य येथून थेट गोडावूनपर्यंत पोहोचविले जात होते. देसूर येथे मागील साडेचार वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात गुड्सशेड सुरू होते. सांबरा रेल्वेस्थानकाचा विस्तार गुड्सशेडच्या हेतूनेच करण्यात आला. 2016 पासून या रेल्वेस्थानकाचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर आता देसूर येथील गुड्सशेड सांबरा येथे हलविण्यात आले आहे. सध्या रेल्वेस्थानकात एकूण चार प्लॅटफॉर्म असून यापैकी दोन प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जातात. तर उर्वरित दोन प्लॅटफॉर्म हे मालवाहतुकीसाठी वापरले जात आहेत. वाहनांची ये-जा करण्यासाठी स्वतंत्र काँक्रिटचा रोड करण्यात आला आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी रेस्टरूम, शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंडाल्कोसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म
बेळगावमधील हिंडाल्को कंपनीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात ने-आण केली जाते. यासाठी हिंडाल्को कंपनीने स्वतंत्र एक प्लॅटफॉर्मची मागणी केली होती. त्यानुसार सांबरा रेल्वेस्थानकात गुड्सशेडमध्ये स्वतंत्र प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी देण्यात आला आहे. यापुढील काळात हिंडाल्को कंपनीचा सर्व कच्चामाल या प्लॅटफॉर्मवर उतरणार आहे.
देसूर, सांबरा रेल्वेस्थानकांचे महत्त्व वाढणार
बेळगाव रेल्वेस्थानकातून अनेक शहरांना रेल्वेसेवा सुरू होत आहेत. त्यामुळे भविष्यात रेल्वेच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यासाठीच नैर्त्रुत्य रेल्वेने देसूर येथे पार्किंगची व्यवस्था करण्याचा विचार सुरू केला आहे. देसूर हे जंक्शन होणार असून तेथून बेळगाव-धारवाड नवीन रेल्वेमार्ग जाणार आहे. त्याचबरोबर सांबरा या ठिकाणीही बेळगाव-कोल्हापूर व बेळगाव-सावंतवाडी यासाठीचे जंक्शन करण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वेस्थानकांचे महत्त्व पुढील काळात वाढणार आहे.