‘वंदे मातरम्’च्या स्मरणोत्सवाचा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे ‘मंत्र’ असलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवपूर्तीच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये एका शानदार कार्यक्रमात या ‘स्मरणोत्सवा’चा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम देशभरात सर्वत्र 7 नोव्हेंबर 2025 पासून एक वर्षभर साजरा केला जाणार आहे.
7 नोव्हेंबर 1875 या दिवशी थोर बंगाली कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी या प्रेरणादायी गीताची निर्मिती केली. प्रथम हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ नामक प्रसिद्ध कादंबरीचा भाग म्हणून परिचित झाले. नंतर ते स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारकांसाठी स्फूर्ती आणे प्रेरणेचा मंत्र म्हणून सिद्ध झाले. आजही ते दीडशे वर्षांपूर्वीइतकेच भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.
समूहगानाचा कार्यक्रम
दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या गीताच्या ‘स्मरणोत्सवा’च्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गीताच्या समूहागान कार्यक्रमातही भाग घेतला. यावेळी या गीताच्या संपूर्ण संस्करणाचे समूहगान करण्यात आले. या कार्यक्रमाला दिल्लीचे उपराज्यपाल विनय सक्सेना आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. वंदे मातरम् या गीताच्या सन्मानार्थ डा तिकिट आणि एका नाण्याचेही अनावरण करण्यात आले.
देशव्यापी कार्यक्रम
या गीताचा स्मरणोत्सव एक वर्षभर साजरा केला जाणार आहे. या कालावधीत देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अनेक सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रम केले जाणार आहेत. या गीताचा भारताच्या तरुण पिढीला नव्याने परिचय व्हावा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये या गीताचे समूहगान केले जाणार आहे. शुक्रवारीही देशभरात अनेक स्थानी हा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला.
1 ऑक्टोबरपासून सज्जता
1 ऑक्टोबर 2025 या दिवशी केंद्र सरकारने हा स्मरणोत्सव देशव्यापी पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या कार्यक्रमासाठी सज्जता करण्यात येत होती. सर्व राज्यांच्या सरकारांना या कार्यक्रमासंबंधी महिती पाठविण्यात आली. बहुतेक सर्व राज्यांनी हा कार्यक्रम भव्य पद्धतीने साजरा करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
भाजपचाही पुढाकार
भारतीय जनता पक्षानेही या गीताचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव भव्य पद्धतीने देशभर साजरा करण्यासाठी योजना साकारली आहे. ‘वंदे मातरम्‘ या गीताप्रमाणे या वर्षी ब्रिटीशांशी संघर्ष केलेल्या थोर वनवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचीही 150 वी जयंती आहे. हे दोन्ही कार्यक्रम भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.