For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्य बाजारपेठेत येताय? पैसे-दागिने सांभाळा!

06:58 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्य बाजारपेठेत येताय  पैसे दागिने सांभाळा
Advertisement

पांगुळ गल्लीत महिलेची पर्स लांबवली, वाढत्या गर्दीत गुन्हेगारांकडून हातचलाखी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

श्रावण व गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे. या गर्दीचा फायदा घेत गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. बाजारपेठेत पाकिटमारी व महिलांच्या पर्स पळविण्याच्या घटना वाढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पांगुळ गल्ली येथे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पर्स पळविण्यात आली आहे.

Advertisement

पर्स लांबविण्याच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, यासंबंधी रात्री उशिरापर्यंत पोलिसात फिर्याद दाखल झाली नाही. न्यू शिवाजी कॉलनी, पापामळा, टिळकवाडी येथील शुभांगी सुरेश नेसरकर (वय 60) या खरेदीसाठी शनिवारी सायंकाळी बाजारपेठेत आल्या होत्या. पांगुळ गल्ली येथील एका स्टेशनरी दुकानात खरेदी करताना त्यांच्या बॅगमधील पर्स लांबविण्यात आली आहे.

या पर्समध्ये 8 हजार 500 रुपये होते. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी त्या शहरात आल्या होत्या. त्यांच्यासोबत आणखी एक सहकारी होत्या. या दोघी पांगुळ गल्ली येथे खरेदी करताना तीन महिला शुभांगी यांच्या आजूबाजूला व पाठीमागे थांबल्या. एका महिलेने शुभांगी यांच्या व्हॅनिटी बॅगमधील पर्स पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले आहे.

खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली आदी मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढते आहे. या गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पर्स पळविण्यात येत आहेत. महिला गुन्हेगारांचाही बाजारपेठेत वावर वाढला आहे. खरेदीसाठी येणाऱ्या महिलांचा पाठलाग करीत त्यांना पत्ता नसताना त्यांच्या बॅगमधील रोकड व दागिने पळविण्यात येत आहेत.

पै पै साठवले मात्र...

शुभांगी यांनी गणेशोत्सवासाठी पैसे साठवून ठेवले होते. क्षणार्धात चोरट्यांनी ते पळविले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. श्रावणानंतर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशी सणांची मालिका सुरू होते. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढणारच. गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली जात असून नागरिकांनीही आपल्याजवळील दागिने व रोकडबाबत सावधानता बाळगावी.

Advertisement

.