दिलासा
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील लाखो कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. बुधवारी बैठकीत रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या पतधोरण समिती बैठकीत व्याजदरात कपात केली होती. आरबीआयने व्याजदरात 0.25 टक्के कपात केली होती तर, आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा कर्जदारांना व्याजदर कपातीची भेट दिली आहे. यासह आता रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6.00 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. याचा अनेक मध्यमवर्गीयांना लाभ होणार आहे, जगभर अमिरेकेने सुरु केलेले ट्रंप टेरिफ व्यापारी युद्ध आणि जगभरच्या अर्थव्यवस्था डगमगत असताना हिंदुस्थानने उचललेली आणि उचलत असलेली पावले आत्मविश्वासपूर्ण म्हटली पाहिजेत. जगाला मंदीची भीती आणि महागाईची, बेरोजगारीची धास्ती वाटत आहे. चीन आणि अमेरिका व्यापार युद्धासाठी दंड थोपटून उभे ठाकले आहेत. अमेरिकेने टेरिफ वाढवताच चीनने आपलेही टेरिफ वाढवले आहे, वाढवलेले टेरिफ 24 तासात मागे घ्या अन्यथा टेरिफ शंभर टक्क्यांनी वाढवू अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे पण चीन डगमगलेला नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा चीनने पवित्रा घेतला आहे, जगातले लहान मोठे देश ट्रंपच्या या आणि अशा निर्णयाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तथापि भारताने अमेरिकेला कोणतीही विनवणी वा उत्तर न देता या संकटात संधी शोधायला सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेची मनी पॉलिसी हा त्याचाच भाग आहे. जेव्हा मंदी येते किंवा मंदीचे वातावरण असते तेव्हा त्यावर मात करण्यासाठी हाउसिंगला प्रोत्साहन द्यावे असे अर्थशास्त्र सांगते. घरबांधणीसाठी मजुरापासून, वायरमनपर्यंत आणि रंग, स्टील, सिमेंट, विटा, लाकूड, फर्निचर इथपासून जेवणावळीपर्यंत अनेक उद्योग व हातांना काम मिळते व अर्थव्यवस्था गतीमान होते. सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढते. बँकिंग क्षेत्रालाही वाढीचा स्कोप मिळतो, रिझर्व्ह बँकेच्या या नव्या धोरणाने ईएमआय कमी होईल आणि मंदीचा ढग बाजूला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयासोबत आणखी एक आनंदवार्ता आली आहे ती आहे यंदा पाऊस चांगला, वेळेवर व समाधानकारक होणार. पाऊस चांगला झाला तर भारतीय शेतकरी कुणाही महाशक्तीला डरत नाही. हिंदुस्थानचे एकेकाळी इंग्लंडमध्ये गहाण पडलेले सोनं शेतकऱ्यांनी सोडवले होते हा इतिहास आहे आणि ट्रंपनी 26 टक्के टेरिफ लावले तरी भारताने त्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली वा व्यक्त केलेली नाही. यातच अनेक अर्थ दडलेले आहेत. जग कोरोना महामारीत नोटा छापत चलनवाढ करत होते तेव्हा भारत या महामारीवर मात करताना लसीचा शोध, सर्वांना मोफत लस आणि सर्वांना मोफत अन्नधान्य हे निर्णय घेऊन यशस्वी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच सांगत आले आहेत ‘भारत झुकेगा नही, रुकेगा नही आम्ही जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ आणि 2047 साली आम्ही जगातली महाशक्ती असू’. त्यामुळे ट्रंप यांच्या 26 टक्के टेरिफचा निर्णय भारताला अडचणीत आणणारा असला तरी भारताने कोणतीही गयावया अथवा शरणागती वगैरे भूमिका घेतलेली नाही. ट्रंप यांच्या व्यापार युद्ध घोषणेनंतर अमेरिकेत मोठा गोंधळ उडाला आहे. लोक रस्त्यावर उतरून ट्रंप यांचा निषेध करत आहेत. अमेरिकन शेअर बाजार विक्रमी स्तरावर कोसळला आहे. जगभरचे शेअर बाजारही ब्लडबाथ करत आहेत. या वादळात भारतीय शेअर बाजारालाही फटका बसला आहे. स्वाभाविक आहे. पण तुलनेने जगात आपली अर्थव्यवस्था व शेअर मार्केट चांगले मानले जाते आहे. साधारणपणे शेअरबाजार कोसळतो तेव्हा सोने उसळी घेते पण आजघडीला शेअरबाजार, सोने, तेल, रोजगार, मागणी या सर्वच पातळीवर उतार दिसतो आहे. भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेतील निर्यात व आयातीवर फारशी अवलंबून नाही, भारताच्या एकुण अर्थव्यवस्थेच्या दोन टक्केही हे प्रमाण नाही. त्यामुळे ट्रंपनी कितीही आदळ आपट केली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही असे अनेकांचे मत आहे. ओघानेच शांत डोक्याने पण निर्धाराने आपण जगावर आलेल्या या संकटात संधी शोधतो आहोत हे दिसून आले आहे. ट्रंप टेरिफ वाढवणार हे लक्षात येताच पाच जम्बो विमाने भरुन काही कोटी अॅपल फोन काही तासांत अॅपल कंपनी व भारत सरकारने अमेरिकेत पोहचवले. ते अमेरिकेत वर्षभराच्या विक्रीला पुरतील इतके आहेत. यातून जगभरच्या बड्या उद्योगांना चांगला मेसेज गेला आहे. भारत थांबणार नाही, हाच मेसेज यातून अधोरेखित झाला आहे. अमेरिकेत जो उठाव सुरु आहे आणि जगभरच्या तेल कंपन्या, व्यापार कंपन्या, उद्योजक जी पावले उचलत आहेत ती पाहता ट्रंपना आज ना उद्या माघार घ्यावी लागेल हे स्पष्ट होते. ट्रंप यांचे मित्र व सल्लागार इलॉन मस्क यांचीही चरबी या व्यापार युद्धात पातळ झाली आहे. त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. भारताने गेली काही वर्षे जगभरातील लहान मोठ्या देशांशी जे मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत ते आता रंग आणतील अशी चिन्हे आहेत. भारताची निर्यात या छोट्या छोट्या देशांना वाढेल, रशिया भारतासोबतचा कायमचा मित्र आहेच. जे गाव करील ते राव करीत नाही याची अमेरिकेला प्रचिती येईल. मुळात अमेरिका देश अनेक गोष्टीसाठी जगावर अवलंबून आहे. जग त्यांना नमवेल हे वेगळे सांगायला नको. तूर्त भारत फारसा न गोंधळता निश्चित निर्धाराने पावले टाकताना दिसतो आहे. जोडीला रिझर्व्हने रेपोदर कमी करत दिलासा दिलाय. ईएमआय कमी होऊन हाऊसिंग व शेतीला कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होते आहे. पाऊसमान चांगले असणार असे भाकीत आहे. या सर्वाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर उत्तम परिणाम होईल व तो व्हावा यासाठी मोदी व त्यांची टीम पावले टाकताना दिसत आहे. संकटात संधी शोधण्याचा या प्रयत्नात तुम्ही आम्ही सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. आपणही वैयक्तिक जीवनात संधी शोधल्या पाहिजेत.