For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Politics | चौकात ये दाखवतोच...; कोल्हापुरात आयुक्तांसमोरच नगरसेवक भिडले

01:50 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra politics   चौकात ये दाखवतोच     कोल्हापुरात आयुक्तांसमोरच नगरसेवक भिडले
Advertisement

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेची मंगळवारी झालेली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक अक्षरशः रणसंग्राम ठरली! महापालिका आयुक्तांसमोरच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शारंगधर देशमुख एकमेकांना थेट भिडल्याने महापालिकेच्या आवारात मोठा राडा झाला.

Advertisement

दुपारी दोन वाजता आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या समोर ही बैठक सुरू होती. नगरसेविका मानसी लोळगे यांच्या प्रभागातील वादग्रस्त वृक्षतोडीचा विषय समोर येताच आदिल फरास आणि शारंगधर देशमुख यांच्यात खडाजंगी उडाली. वादाचे रूपांतर इतक्या टोकाला गेले की, दोघांनीही एकमेकांसमोर शड्डू ठोकत "बाहेर चौकात ये, बघून घेतो!" अशी भाषा वापरली आणि ते अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आयुक्तांसमोरच १५ मिनिटे हा थरार सुरू राहिला, ज्यामुळे व्यथित होऊन आयुक्तांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने महापालिकेत दाखल झाले आणि संपूर्ण परिसरात अडीच तास तुफान तणाव पाहायला मिळाला. हा सर्व प्रकार महापालिकेच्या लाईव्ह प्रक्षेपणामुळे थेट बाहेर पोहोचल्याने मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक यांनी थेट पदाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली.

Advertisement

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर महापौर रूपााराणी निकम यांनी स्वतः मैदानात उतरत धाडस दाखवले. त्यांनी आणि पोलिसांनी महापालिका चौकात जमलेल्या शेकडो समर्थकांना थेट रस्त्यावर येऊन शांततेचे आवाहन केले आणि हटकत तिथून बाहेर काढले. त्यानंतर सभापती बागवान यांच्या दालनात दोन्ही नेत्यांची समजूत काढण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत प्रथम शारंगधर देशमुख आणि नंतर आदिल फरास यांना आलटून-पालटून महापालिकेतून सुखरूप बाहेर काढले. महायुतीची सत्ता आल्यापासून उफाळून आलेला हा वाद आणि आयुक्तांसमोर झालेला हा हायव्होल्टेज ड्रामा दिवसभर संपूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला.

Advertisement
Tags :

.