चला, रस्त्यावर रांगा !
कोणत्याही कंपनीत किंवा संस्थेत आपण काम करत असता, तेव्हा प्रत्यक्ष कामाच्या व्यतिरिक्त इतरही अनेक ‘अॅक्टिव्हिटीज’ मध्ये घेतल्यास आपल्यासह संस्थेत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांशी आपले संबंध अधिक दृढ होतात, असा अनेक कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. संस्थेच्या वतीने अनेक स्पर्धा याच कारणासाठी आयोजित केल्या जातात. त्यांच्यात कर्मचारी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार किंवा आवडीनुसार भाग घेतात. कर्मचाऱ्यांवर असा भाग घेण्याची सक्ती नसते, पण अनेकजण त्यांच्या आनंदासाठी आणि संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी अशा स्पर्धेत भाग घेण्याचा आणि ती जिंकण्याचा प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांनी मोठी स्पर्धा जिंकल्यास संस्थेचे नाव होते आणि कर्मचाऱ्यांनाही एक वेगळा आनंद प्राप्त होतो.
तथापि, चीनमधील एका संस्थेत अशी एक स्पर्धा झाली, की तिची चर्चा आज जगभरात होत आहे. या संस्थेतील कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी मार्गांवरुन रांगत जाण्यास सांगण्यात आले. मुख्य म्हणजे, अशा काही स्पर्धेत आपल्याला भाग घ्यावा लागेल, अशी कल्पनाही या कर्मचाऱ्यांना आधी देण्यात आली नव्हती. काही कामानिमित्त त्यांना बोलाविण्यात आले आणि अचानकपणे मार्गावरुन रांगण्याचा आदेश देण्यात आला. एका कर्मचाऱ्यानी ही घटना सोशल मिडियावर टाकली आणि तो मोठ्या चर्चेचा विषय बनला. जेव्हा कर्मचाऱ्यांना, त्यांच्या ध्यानी मनी नसताना रांगण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा कित्येकांना आधी ती एक शिक्षाच वाटली. त्यामुळे, आपली कोणती चूक झाली, याचा विचार करत ते रांगू लागले.
या घटनेची जोरात चर्चा होऊ लागली, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यांनी संस्थाचालकांची चौकशी केली. तेव्हा उलगडा झाला. ही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली स्पर्धारुपी शिक्षाच होती. या कर्मचाऱ्यांनी एका टीम बाँडिंग खेळात भाग घेतला होता. तथापि, ते तो खेळ हारले होते. परिणामी, संस्थेची प्रतिष्ठा कमी झाली, म्हणून त्यांना मार्गावरुन रांगण्याची शिक्षा देण्यात आली होती. तथापि, ही शिक्षा न वाटता एक नवी स्पर्धाच कर्मचाऱ्यांना वाटावी, असे रुप या शिक्षेला देण्यात आले होते. पण हा प्रकार संस्था व्यवस्थापनाच्या अंगलट आल्याचे दिसून येते. कारण आता पोलिसांनी व्यवस्थापनाविरोधात कारवाई सुरु केली आहे.