चला, अनुभवूया दोन तुल्यबळ संघांतील लढत!
चॅम्पियन्स ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात पोहोचली. अपेक्षा पुन्हा दक्षिण आफ्रिकाच भिडेल अशी होती, परंतु न्यूझीलंडने आफ्रिकेला ‘दे धक्का’ दिला. क्रिकेटने पुन्हा एकदा क्रिकेट विश्लेषकांना तोंडावर पाडलं. 70 ते 75 टक्के क्रिकेट विश्लेषकांनी दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचेल, असा कयास केला होता. माझाही अगदी तसाच कयास होता. पुन्हा एकदा मी तोंडावर आपटलो. या स्पर्धेत न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचेल असे धाडसाने सांगणारे निश्चित विरळा असतील.
न्यूझीलंड हा असा संघ आहे ज्यांच्याकडे प्रतिभावंत फलंदाज, गोलंदाज असूनसुद्धा क्रिकेटच्या बॉक्स ऑफिसवर म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. 1996 च्या वर्ल्ड कपच्या झटपट क्रिकेटमध्ये जयसूर्या आणि कालूविथरणा यांनी आक्रमकता आणली खरी. परंतु त्याची खरी सुऊवात या अगोदर मार्क ग्रेटबॅचने केली. त्याचप्रमाणे सफेद चेंडूवर डावाची सुऊवात एखाद्या मंदगती गोलंदाजाने करावी आणि प्रतिस्पर्धी संघाला बुचकळ्यात टाकण्याचं कामही भारतीय वंशज असणाऱ्या न्यूझीलंडच्या दीपक पटेलनंच केलं होतं. या सर्वांचा कळस तो काय तो 2019 मधील वर्ल्डकप. क्रिकेटच्या विचित्र नियमावलीने विश्वचषक त्यांच्या हातातून कसा निसटला हे आपण सर्वश्रुत आहातच. एखादा चित्रपट हिट झाल्यानंतरसुद्धा त्या चित्रपटाला आर्ट फिल्मचा शिक्का बसावा, नेमकी तीच परिस्थिती न्यूझीलंडची. फार पूर्वी न्यूझीलंडचे गोलंदाज पाटा खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास उत्सुक नसायचे. सर रिचर्ड हॅडलीने आपल्या कारकिर्दीत जे बळी मिळवले त्यापैकी 90 टक्के बळी जलदगती गोलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर मिळवले. परंतु मागील काही दशकात हा विरोधाभास न्यूझीलंड संघात बघायला मिळतो. ताजंच उदाहरण द्यायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीची भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका. बऱ्याच वर्षांनंतर भारताला मिळालेला व्हाईटवॉश... तोही भारतीय खेळपट्टीवर.
काल ज्या पद्धतीने न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविऊद्ध परिपक्वता दाखवली त्यावरून भारतीय संघाचे अंतिम सामन्यात काही वेगळे डावपेच अपेक्षित आहेत. विल यंग, रचीन रवींद्र, केन विल्यमसन ही मंडळी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका वठवतायेत. विशेषत: रचीन रवींद्र याचं कालचं पाचवं शतक. सगळी शतकं ही आयसीसी इव्हेंटच्या प्लॅटफॉर्मवरती. कधी विश्वचषकात तर कधी चॅम्पियन्स ट्रॉफीत. त्यांच्याकडे असणारे स्पिनर्स मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल हे अचानक सामन्यात ‘अजूबा’ आणणारी कामगिरी करू शकतात. दुसरीकडे भारताचा विचार केला तर दृष्ट लागण्यासारखीच कामगिरी भारताने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केली आहे. लीग सामन्यात कदाचित एखादा पराभव भारताचा होईल असं वाटत होतं. परंतु लीगमधील तीन आणि उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण सामना जिंकत स्पर्धेत अंतिम फेरीत अगदी दिमाखदार पद्धतीने प्रवेश केला. कधी शुभमन गिल, कधी विराट कोहली, तर कधी श्रेयस अय्यरने भारताला सावरलं. कधी नव्हे ते आयसीसीच्या मोठ्या इव्हेंटमध्ये फक्त दोन मध्यमगती गोलंदाज घेऊन स्पिनर्सवर विश्वास दाखवत जी कामगिरी भारतीय संघाने केली आहे त्याला तोड नाही. भारताचे सर्व शिलेदार खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धी संघांना पुरून उरले.
भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल की नाही याबाबत मी थोडा साशंक होतो. परंतु भारताचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास हा अगदी शाही विवाह सोहळ्यासारखा होता. आता फक्त एक मोठं रिसेप्शन बाकी आहे. असो. एकंदरीत ही स्पर्धा रंगणार की नाही हा ना-ना चा पाढा वाचणाऱ्यांना भारत विऊद्ध न्यूझीलंड या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील समारोपाच्या सामन्याने खऱ्या अर्थाने चपराक दिली आहे. दोन वाघांमध्ये ही लढत आहे, असं मी बिलकुल म्हणणार नाही. परंतु दोन तुल्यबळ संघांमध्ये ही लढत आहे, एवढं मात्र खरं!
विजय बागायतकर