‘चला, उठा , सज्ज व्हा!’
भाजपच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत दिला मंत्र : गोव्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपची रणनीती जाहीर
आगामी 2027 मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पणजी येथे काल, शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीत ‘चला, उठा, सज्ज व्हा!’, असा मंत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला. गोव्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती जाहीर केली असून, सर्वांनी एकत्र येऊन 30 जागा जिंकण्याचा सल्ला ह्या बैठकीत देण्यात आला.
त. भा. प्रतिनिधी
पणजी : या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री एन. मुऊगन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला व संस्कृती खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, सभापती डॉ. गणेश गावकर, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार डॉ. देविया राणे, आमदार डिलायला लोबो, आमदार मायकल लोबो, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, आमदार राजेश फळदेसाई, आमदार ऊडॉल्फ फर्नांडिस, माजी खासदार विनय तेंडुलकर व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांनी एकत्र येऊन 30 जागा जिंकण्याचा सल्ला बैठकीत देतानाच यासाठी मंडळ आणि बूथ पातळीवर पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लोकांच्या फायद्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना आणि भाजपा सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला देण्यात आला. सर्वानंद भगत यांनी सहा महिन्यांचा कामगिरीचा (कामाचा) अहवाल सादर केला. तसेच भविष्यात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच बारा वर्षांचा (लोकप्रतिनिधी / शासकीय प्रमुख म्हणून) कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते देशातील सर्वांत जास्त काळ राहिलेले प्रधानमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या विकासाची माहिती यावेळी देण्यात आली. नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव भाजपच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत यावेळी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर प्रधानमंत्र्यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणे, त्यातील आशय लोकांपर्यंत पोहोचवणे आणि या कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.
स्व. रवी नाईक यांच्याविषयी कृतज्ञता
हल्लीच निधन झालेले मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री रवी नाईक यांच्या निधनाबद्दल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर बूथ पातळीवर जाऊन सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.