For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळातून भरपूर अनुभव घेऊन ये!

06:24 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंतराळातून भरपूर अनुभव घेऊन ये
Advertisement

शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधान मोदींचा संवाद : ‘पीएमओ’ने शेअर केले छायाचित्र

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. ‘अंतराळातून भरपूर काही अनुभव घेऊन माघारी ये. तुझ्या अनुभवाचा फायदा भविष्यातील मोहिमांमध्ये देशाला होईल’, असे पंतप्रधानांनी शुक्ला यांच्याशी झालेल्या संवादावेळी सांगितले. ही माहिती शनिवारी सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाकडून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर शुक्ला यांनी अॅक्सिओम स्पेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) प्रवास करून इतिहास रचला होता. त्यांच्यासोबत तीन इतर अंतराळवीर आहेत. राकेश शर्मा यांनी रशियन अंतराळयानातून उ•ाण केल्यानंतर 41 वर्षांनंतर भारतीय अंतराळवीराचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे.

Advertisement

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी पंतप्रधान मोदींनी शुभांशूला गृहपाठ दिला. आपल्याला गगनयान मोहीम पुढे न्यायची आहे. आपल्याला आपले स्वत:चे अंतराळ स्थानक बांधायचे आहे. यासोबतच आपल्याला भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर उतरवायचे आहे, तुमचे अनुभव या सर्व मोहिमांमध्ये खूप उपयुक्त ठरतील. मला खात्री आहे की तुम्ही तेथे तुमचे अनुभव नक्कीच नोंदवत असाल, असे पंतप्रधानांनी शुभांशूला सांगितले.

या मोहिमेसाठी प्रशिक्षण घेताना मी जे काही शिकलो आहे, ते मी एक्सपोजरसारखे आत्मसात करत आहे. मला खात्री आहे की मी परत येईन तेव्हा ते आपल्या देशासाठी खूप महत्वाचे असेल. आपण हे अनुभव आपल्या मोहिमेत लागू करू शकू आणि शक्य तितक्या लवकर अनेक मोहिमा पूर्ण करू. मी माझे अनुभव आपल्या देशाच्या मोहिमेत लागू करेन, असे शुभांशू शुक्ला म्हणाले.

प्रयोगांच्या प्रश्नावर शुभांशू म्हणाले की, भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच 7 अनोखे प्रयोग डिझाइन केले असून ते मी माझ्यासोबत अंतराळ स्थानकावर आणले आहेत. पहिला प्रयोग स्टेम सेल्सवर आधारित आहे. खरं तर, जेव्हा गुरुत्वाकर्षण अंतराळात संपते तेव्हा स्नायूंचे नुकसान होते. काही सप्लिमेंट्स देऊन आपण हे स्नायूंचे नुकसान थांबवू शकतो किंवा विलंब करू शकतो यावर मी प्रयोग करत आहे. त्याचा पृथ्वीवरही थेट परिणाम होतो. वृद्धापकाळात स्नायूंच्या नुकसानाचा त्रास असलेल्या लोकांवर हे सप्लिमेंट्स वापरले जाऊ शकतात, असे शुभांशूने पंतप्रधानांना सांगितले.

हा गगनयान मोहिमेच्या यशाचा पहिला अध्याय : पंतप्रधान

आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला वेगवान गती आणि नवीन शक्ती देईल. भारत जगासाठी नवीन अवकाश शक्यतांचे दरवाजे उघडणार आहे, आता भारत केवळ उ•ाण करणार नाही तर भविष्यात नवीन उ•ाणांसाठी व्यासपीठ देखील तयार करेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.

यापूर्वीही पंतप्रधानांकडून अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी बुधवारी शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अंतराळात यशस्वी उ•ाण केल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये ‘हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेतील अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे भारत स्वागत करतो.’ असे म्हटले होते. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, आशा आणि आकांक्षा आपल्यासोबत नेल्या आहेत. त्यांना आणि इतर अंतराळवीरांना यशासाठी शुभेच्छा, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते.

स्पेसएक्सच्या नवीन ड्रॅगन अंतराळयानातून शुक्ला यांच्यासह इतर अंतराळवीर अवकाशात पोहोचले आहेत. हे अंतराळयान अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन-9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकन कमांडर पेगी व्हिट्सन करत आहेत. शुभांशू शुक्ला हे त्याचे मिशन पायलट आहेत. त्यांच्याशिवाय हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आणि पोलंडचे स्लावोज उझनान्स्की विस्निव्स्की हे मिशन तज्ञ म्हणून गेले आहेत.

Advertisement
Tags :

.