महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेळातून रोजगाराचा मेळ

06:35 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खेळ आणि क्रीडा क्षेत्र हे आता केवळ व्यावसायिकच राहिले नसून त्यातून क्रीडा साहित्य निर्मिती व विक्री, खेळांच्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धा वा कार्यक्रमाचे आयोजक एवढेच नव्हे तर क्रीडा व्यवस्थापनापासून प्रत्यक्ष खेळाडूंपर्यंत अनेकांना विविध प्रकारचे रोजगार व व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Advertisement

यासंदर्भात भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धांचे उदाहरण प्रामुख्याने देता येईल. भारतीय आयपीएलने त्याची लोकप्रियता रंजकता व विविधता या आधारे अक्षरश: लाखो जणांना व्यवसाय संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या संधी प्रामुख्याने जाहिराती, प्रचार-प्रसार, तिकीट विक्री, आहार व्यवस्था, वाहतूक व पर्यटन व्यवसाय, क्रीडा व्यवस्थापन-मार्गदर्शन इत्यादी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असून त्याचा फायदा मोठ्या संख्येत होत आहे. याचा अधिकांश लाभ हा युवा वर्गाला होत आहे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. सद्यस्थितीत भारतात प्रामुख्याने 10 मुख्य स्वरूपाच्या आयपीएल क्रीडा स्पर्धा होत आहेत.

Advertisement

यामध्ये मुख्यत: क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कब•ाr या लोकप्रिय खेळांचा समावेश आहे. या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनांच्या जोडीलाच आता तर आंध्र प्रीमियर लीगपासून झी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा यापर्यंतच्या राज्य व प्रादेशिक स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे त्यांना मोठ्या रकमांसह प्रायोजकत्व मिळू लागले असून त्यातून मोठी आर्थिक उलाढाल कायमस्वरूपी होत आहे. त्यातून निर्माण झालेल्या मोठ्या लाभाकडे पाहता या स्पर्धा आयोजनात आता

कॉर्पोरेट कंपन्या प्रामुख्याने उतरल्या आहेत. त्यामुळे खेळांपुरत्या मर्यादित असणाऱ्या स्पर्धांमुळे आर्थिक व्यवहार, व्यवसाय व फायद्यांवर अधिक जोर दिला जात आहे.

जाणकारांच्या मते भारताचे भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या, त्यातील युवकांचे प्रमाण व सद्यस्थिती पाहता भारतात मोठ्या प्रमाणात खेळ आणि क्रीडा आयोजनांसाठी मोठा वाव आहे. भारताच्या विविध प्रांतांचे स्वत:चे असे क्रीडा प्रकाराचे वैशिष्ट्या असून त्याचा फायदा क्रीडा आयोजनांमुळे होणार आहे. यासंदर्भात केरळमधील सहा खेळाडूंसह खेळल्या जाणाऱ्या ‘सेव्हन्स फुटबॉल’पासून काश्मीरमधील लाकडी  काठी व लाकडी चेंडूचा खेळला जाणारा ‘खोदार खान’ पासून नागालँडच्या ‘बांबू फेक’ खेळापर्यंतचे उदाहरण वानगीदाखल दिले जात आहे. यातून भारतातील विविध खेळांचे वेगळेपण व त्यात विविध राज्य व भौगोलिक क्षेत्रानुसार या खेळांना मिळणारा प्रतिसाद व लोकमान्यता स्पष्ट होते. या क्रीडा प्रकारांचे एक समान सूत्र म्हणजे त्यांच्यामुळे क्रीडा विषयक संधी-रोजगार व स्वयंरोजगार इत्यादी संधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात सातत्याने उपलब्ध होतात.

सरकारी स्तरावर जारी करण्यात आलेल्या क्रीडाविषयक धोरणानुसार देशांतर्गत क्रीडा कौशल्य व विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्यांना प्रशिक्षणापासून मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यापर्यंत भर देण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 45 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी पाचशे कोटींची तरतूद क्रीडा प्रशिक्षक व प्रशिक्षणासाठी केली होती. सरकारच्या याच धोरणानुसार निश्चित व कालबद्ध स्वरूपात क्रीडा प्रशिक्षणातून क्रीडा कौशल्यांसह अधिकाधिक संख्येत युवकांना अव्वल बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातून भारतीय युवकांना ऑलिंपिक व इतर जागतिक स्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आवर्जून सामावून घेतले जाते.

क्रीडा क्षेत्रात आणि या क्षेत्रासाठी सरकारने व सरकारी स्तरावर काय करावे व करता येण्यासारखे आहे हा मुद्दा विविध संदर्भात नेहमीच चर्चेत असतो. सरकारतर्फे क्रीडापटूंना शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, अर्थसहाय इत्यादी केले जाते. याशिवाय शासनाच्या विविध योजना पण राबवल्या जातात.

मात्र सरकारने राज्य व केंद्र स्तरावर आपापल्या वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद केल्यास खेळ आणि क्रीडापटूंना कायमस्वरूपी प्रोत्साहन मिळू शकेल. यातूनच काही प्रयत्न, पुढाकार विविध राज्यस्तरांवर घेतले जाऊ शकतात. महाराष्ट्र व हरियाणा यासारख्या राज्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देणे फायदेशीर ठरू शकते. वा वन आणि वनवासी बहुल राज्यांनी नेमबाजी व मल्लखांब सारख्या खेळाडू आणि क्रीडा प्रकारांना योजनापूर्वक प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिल्यास त्याचे फायदे राज्या पुरतेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकतात. हे या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते.

खेळ आणि क्रीडा प्रकारांचा वाढता व्याप आणि प्रसार यामुळे विविध प्रकारच्या खेळांसाठी आवश्यक क्रीडा साधने आणि सामुग्रीचे उत्पादन व विक्री हे नोकरी-व्यवसायाचे एक नवे दालन विकसित स्वरुपात उपलब्ध झाले आहे. विविध क्रीडा वस्तु व संबंधीत सामान यांचे उत्पादन व विक्री आता अनिवार्य ठरली आहे. त्यातही या क्षेत्राचे वैशिष्ट्या म्हणजे एकीकडे वाढत्या क्रीडा प्रसाराबरोबरच त्यांना लागणाऱ्या अधिकांश वस्तु एकवेळ वापरणे वा वारंवार बदलणे या प्रकारच्या असतात. क्रिकेटच्या बॉल-बॅटपासून

बॅडमिंटन, फुटबॉल व थेट कुस्तीच्या गादीपर्यंतच्या वस्तुंचा यात समावेश करता येऊ शकतो.

खेळ आणि क्रीडा प्रकारांसाठी कायमस्वरूपी आवश्यक अशा वस्तू आणि उपकरणे-उत्पादने यांच्या उत्पादन-संशोधन, विक्री व्यवस्थापन व व्यवसाय या संदर्भात सुद्धा भारताने आपली छाप जागतिक स्तरावर प्रस्थापित केली आहे. यामध्ये देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर व्यवसायवाढ झालेली दिसून येते. भारत आणि भारतीय या संदर्भात सांगायचे झाल्यास सद्यस्थितीत आपल्या देशातील युवा आयु वर्गातील लोकसंख्या लक्षणीय स्वरूपात तर आहेच याशिवाय त्यामध्ये सतत वाढ होत आहे. याशिवाय खेळ, मनोरंजन यासारख्या युवकांच्याच नव्हे तर जनसामान्यांच्या दृष्टीने पण महत्त्वाच्या व प्राधान्याच्या क्षेत्रात सहभागी होणारे, विविध क्रीडा प्रकार आणि आयोजनांमध्ये रुची घेणारे व प्रसंगी त्यासाठी खर्च करणारे या साऱ्यांमध्ये होणारी वाढ क्रीडा क्षेत्रासाठी सर्वोपरी पूरक ठरली आहे.

राष्ट्रीय क्रीडा उद्योगाच्या संदर्भात नव्यानेच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार 2023 या आर्थिक वर्षाअखेर भारतातील क्रीडा क्षेत्र आणि खेळ उद्योगाची एकत्रित उलाढाल 5.1 अब्ज डॉलर्सची होती. याच अंदाजानुसार 2032 पर्यंत भारतातील खेळ उद्योगाची अधिक वाढ होऊन त्याची एकत्रित उलाढाल 10 अब्ज डॉलर्स होणे सहज शक्य आहे. या ढोबळ आकडेवारीवरून भारताची क्रीडा क्षेत्राची वाढ व त्यातून होणारी वाढती आर्थिक उलाढालीची प्रामुख्याने कल्पना येते. या आर्थिक उलाढालीतून वाढता व्यवसाय व क्रीडा विषयक विविध संधी प्रत्यक्षाप्रत्यक्ष स्वरूपात निश्चितपणे उपलब्ध होणार आहेत.

परंपरागतरीत्या सांगायचे झाल्यास भारतातील क्रीडा आणि खेळ साहित्य विषयक साहित्य निर्मिती उद्योगाची सुरुवात भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या व पंजाबमध्ये जालंधर व उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबाने केली व आपली मेहनत व कौशल्यांच्या आधारे देश-विदेशात नावलौकिक कमावला. आज 75 वर्षानंतर पण या कारागीर व लघुउद्योजकांना कुठलीही औपचारिक साथ वा सहाय्य न मिळता पण त्यांनी परिश्रमपूर्वक व खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर स्वरूपात आपले काम सुरूच ठेवले आहे.

अर्थात गेल्या दहा वर्षात भारतातील क्रीडा साहित्य निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. गेल्या वर्षीपासून मेरठ व जालंधर या दोन्ही ठिकाणी क्रीडा साहित्य निर्मिती व उत्पादन उद्योगातून 2100 कोटी रुपयांच्या सामुग्रीची निर्यात करून जगात आपले नाव आणि कर्तृत्व प्रस्थापित केले आहे.

आता तर क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण व सार्वत्रिक विचार करून त्याला अधिक व्यापक व व्यावसायिक दृष्ट्या देश-विदेश पातळीवर यशस्वी करण्यासाठी क्रीडा व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या प्रतिष्ठित संस्थांनी या कामी पुढाकार घेतला असून त्यामुळे भारतातील क्रीडा करिअर क्षेत्राला व्यापक दिशा लाभली आहे.

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article