कोलवाळ कारागृहाच्या अधीक्षकांना कैद्यांच्या जामिनाशी शपथपत्रांसाठी शपथ घेण्याचे अधिकार
पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. अश्विन भोवे यांनी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना कैद्यांच्या जामिनाशी संबंधित शपथपत्रांवर शपथ किंवा प्रतिज्ञा घेण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच अशा शपथपत्रांची प्रक्रिया २४ तासांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैदी प्रसाद बाळके याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारावासात असलेल्या आरोपीने शपथपत्र सादर करण्याच्या आवश्यकतेच्या पूर्ततेबाबत एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, कारावासात असलेल्या आरोपीसाठी शपथपत्राची अधिकृत पुष्टी करून घेणे कठीण आहे, कारण त्यासाठी नोटरीला कोलवाळ तुरुंगात न्यावे लागते.
त्यांनी नमूद केले की, नोटरी अनेकदा कोलवाळ तुरुंगात जाण्यास टाळाटाळ करतात किंवा गरजेच्या वेळी उपलब्ध नसतात. याशिवाय या कामासाठी येणारा खर्च आरोपीला परवडण्याजोगा नसतो. त्यांच्या मते, या परिस्थितीमुळे जामीन अर्ज दाखल करण्यास विलंब होतो.
प्रतिवादी-केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेले उप-सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी असे सुचवले की, कोलवाळ तुरुंगात असलेल्या आरोपीकडून शपथपत्राची पुष्टी करून घेण्याबाबत एक व्यावहारिक उपाय शोधणे आवश्यक आहे. ही अडचण निर्माण होण्याचे कारण असे की, कोलवाळच्या कारागृह अधीक्षकांना उच्च न्यायालयाकडून शपथपत्राची पुष्टी करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. कायदेशीर तरतुदींनुसार उच्च न्यायालय कारागृह अधीक्षकांना अशा शपथपत्रांच्या संदर्भात शपथ किंवा प्रतिज्ञा घेण्याचे अधिकार देऊ शकते, जी जामिनासाठी अर्ज करणारा व्यक्ती सादर करणार आहे.
या शपथपत्रात अर्जदाराने सर्व महत्त्वाचे तपशील उघड करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि स्वतः विरुद्ध सुरू असलेल्या कोणत्याही कठोर कायदेशीर प्रक्रिया किंवा इतर कायदेशीर कार्यवाही यांचा समावेश असणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना, केवळ जामिनासाठीच्या न्यायालयीन कार्यवाहीत सादर करावयाच्या शपथपत्रांच्या संदर्भात शपथ किंवा प्रतिज्ञा घेण्याचे अधिकार प्रदान करत आहे. असे शपथपत्र कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांसमोर प्रतिज्ञेसाठी सादर केले गेले, तर न्यायालयीन कार्यवाहीत दाखल करण्याच्या उद्देशाने त्यावर २४ तासांच्या आत योग्य ती कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. या निर्देशाचा उद्देश न्यायालयीन प्रक्रियेतील अडचणी कमी करणे हा आहे.
