हिंडलगा परिसरात रंगोत्सव उत्साहात
वार्ताहर/हिंडलगा
हिंडलगा कार्यक्षेत्रातील विजयनगर, लक्ष्मीनगर, रक्षक कॉलनी, कलमेश्वरनगर, श्रीनाथनगर, गोकुळनगर, समर्थ कॉलनी अशा विविध भागात होलीकोत्सव व रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील लक्ष्मी गल्ली, महादेव गल्ली, रामदेव गल्ली, मरगाई गल्ली, नवीन वसाहत, विठ्ठल मंदिर रोड, मांजरेकरनगर, सोमनाथनगर अशा विविध भागात सोमवारी रात्री पारंपरिक पद्धतीने होळी पेटविण्यात आली. प्रत्येक ठिकाणी गल्लीतील महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून श्रीफळ वाढवून पूजा केली. कांही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिमवर गाणी लावण्यात आली होती. पूर्वीपासून बेळगाव शहराबरोबरच येथे देखील दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. मंगळवारी पहाटेपासूनच बाल गोपाळांनी रंग लावण्यास सुरुवात केली. सकाळी 9 नंतर गावातील युवकांनीदेखील या रंगपंचमीत सहभागी होऊन रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.