For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रंगकर्मी विजयकुमार नाईक यांची ‘एक्झिट’

11:52 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
रंगकर्मी विजयकुमार नाईक यांची ‘एक्झिट’
Advertisement

बाल व युवा रंगभूमीसाठी अभिनव प्रयोग : वेगळ्या विषयांना स्पर्श करणारे नाट्याकर्मी

Advertisement

फोंडा : गोव्यातील प्रतिभावंत नाट्याकर्मी व प्रयोगशिल दिग्दर्शक विजयकुमार विश्वनाथ नाईक (59 वर्षे) यांचे काल गुरुवार 18 रोजी सकाळी निधन झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात ते केवळ नाटक व नाटकासाठीच जगले. त्यांनी नेहमीच वेगळ्या धाटणीचे विषय रंगभूमिवर आणले. बाल व युवा नाट्याचळवळीला उभारी देण्यासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविल्या. त्यांच्या अकाली निधनामुळे एक नाट्याकर्मी नव्हे, तर आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी जगलेला नाट्याधर्मी काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना नाट्याक्षेत्रातील मान्यवर व त्यांच्या असंख्य चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. विजयकुमार यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने पाच दिवसांपूर्वी त्यांना घरी पाठवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व फोंडा उपजिल्हा इस्पितळात नेताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वारखंडे फोंडा येथील जुन्या काळातील ख्यातनाम रंगकर्मी विश्वनाथ नाईक यांचे सुपूत्र असलेल्या विजयकुमार यांनी अगदी वयाच्या बालपणापासून रंगभूमीवर पाऊल ठेवले व शेवटच्या क्षणापर्यंत नाटक हाच त्यांचा ध्यास राहीला. ‘रोम जळत होतं, पालशेतची विहीर, अंधारताना अशी काही सर्जनील नाटके लिहून व दिग्दर्शित कऊन त्यांनी नाटककार म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पालशेतची विहीर या नाटकाला ‘अ’ गट नाट्यास्पर्धेत प्रथम पारितोषिक लाभले. वेगळे विषय व आशयाची काही चिंतनशील नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली.

 बाल, युवा रंगभूमीला दिली चालना

Advertisement

नाट्यालेखन, अभिनय व दिग्दर्शनाबरोबरच हंस थिएटर ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून बाल व युवा रंगभूमीला चालना देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने नाट्याकार्यशाळा व नाट्या शिबिरे घेऊन अनेक नवीन कलाकार घडविले. गोव्यातील मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात ‘विजयकुमार्स ट्रेव्हलिंग बॉक्स’ ही फिरत्या रंगभूमीची संकल्पना असो किंवा ‘घर तेथे नाटक’ असे काही अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या राबविले.

 नाट्याविषयक विविध प्रकार हाताळले

गोव्यातील आद्य नाटककार संत कृष्णंभट बांदकर यांच्या चार नाटकांपैकी उपलब्ध असलेल्या ‘सं. अहिल्योद्धार’ या 1870 मधील नाटकाची दुर्मिळ संहिता मिळवून त्यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणले. महान नाटककार शेक्सपीयर यांच्या ‘हेम्लेट’, युजिन ऑनेल यांची ‘द एम्परर जॉन्स’, स्वदेश दीपक यांचे गाजलेले ‘कोर्ट मार्शल’ अशा अनेक अजरामर नाट्याकृतींचे दिग्दर्शन त्यांनी केले. नाटकाबरोबरच एकांकिका, एकपात्री, रेडिओ श्रुतिका असे रंगभूमीशी निगडीत बहुतेक प्रकार त्यांनी हाताळले. मुलांसाठी नाट्याशिबिरे घेऊन त्यातून स्वलिखित नाटकांची निर्मिती त्यांनी केली.

नाट्याक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान लाभले. अनुराग कला अकादमी केंद्र बिकानेर, राजस्थान यासह पुणे, मुंबईतील नामांकित नाट्यासंस्थांच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. गोवा सरकारचा ‘युवा सृजन’ पुरस्कारही त्यांना लाभला. गोमंतक मराठी अकादमीच्या 2003 सालच्या युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच 2005 साली झालेल्या गोमंतक मराठी नाट्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. देशातील काही महत्त्वाच्या नाट्यासंमेलनांमध्ये वक्ते म्हणून सहभागी होण्याचा मान त्यांना लाभला. कोलंबो येथे झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय थिएटर फेस्टिव्हलमध्येही त्यांनी सहभाग दर्शविला होता. रंगयात्रा हे अखिल गोवा विद्यार्थी नाट्यासंमेलन,  सृजन युवा रंगभूमी उत्सव, नाटक घरोघरी, मुले व युवकांसाठी ‘सृजनशील रंगभूमी’, रंगयात्रा 2007 ही उद्याचे रंगभूमी कलाकार शोधयात्रा, दिलीपकुमार नाईक नाट्या वाचनालय, बॉक्स थिएटर फेस्टिव्हल, रंगविश्वनाथ : पर्यायी रंगभूमी असे रंगभूमीच्या उत्कर्षासाठी विविध अंगानी चालना देणारे अभिनव उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले.

विजयकुमार नाईक यांच्या संपूर्ण कुटुंबानेच आपले जीवन रंगभूमीच्या सेवेत घालविले. वडील विश्वनाथ नाईक हे जुन्या काळातील ख्यातनाम रंगकर्मी होते. त्यांनी स्थापन केलेली हंस संगीत नाट्यामंडळ ही गोव्यातील एक अग्रगण्य नाट्या संस्था गोमंतकीय रंगभूमीच्या इतिहासात नोंदवली गेली आहे. भाऊ स्व. सोमनाथ नाईक व स्व. दिलीपकुमार नाईक यांचेही गोमंतकीय रंगभूमीसाठी विशेष योगदान लाभले. विजयकुमार नाईक यांनी हाच वारसा बराच काळ टिकवून ठेवला. त्यांच्या जाण्याने एका नाट्या चळवळीचा अस्त झालेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्स्ना, पुत्र वरद, भाऊ रवींद्र तसेच पुतणे, भावजया असा परिवार आहे. वारखंडे येथील निवासस्थानी अंत्यदर्शनाला कृषीमंत्री रवी नाईक, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री दीपक ढवळीकर, माजी केंद्रीयमंत्री अॅड. रमाकांत खलप, काँग्रेस नेते राजेश वेरेकर, माजी आमदार लवू मामलेदार तसेच नाट्याक्षेत्रातील असंख्य कलाकार व चाहत्यांनी उपस्थिती लावून दु:ख व्यक्त केले. सायंकाळी फोंडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजयकुमार नाईक यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया

 उत्तुंग प्रतिभेच्या कलाकाराचा अस्त

विजयकुमार नाईक यांच्या अकाली जाण्याने गोमंतकीय नाट्याक्षेत्रातील उत्तुंग प्रतिभेच्या कलाकाराचा अस्त झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, तंत्र या नाटकाच्या सर्वच अंगावर त्यांचा सखोल अभ्यास होता. कोरोनापूर्व काळात स्व. विष्णू वाघ लिखित शिवगोमंतक या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती त्यांनी आपल्या आग्रहास्तव केली होती. हे नाटक येत्या काही दिवसांत पुन्हा रंगमंचावर आणण्याचा आमचा प्रयत्न होता. पण त्यांच्या आजारपणामुळे व अकाली निधनामुळे हा प्रयोग अपूर्ण राहीला. कलाकार व प्रेक्षकांना नाटकाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन त्यांनी दिला. आजन्म नाटक हाच ध्यास घेतलेल्या एका प्रतिभावंताला गोवा कायमचा मुकला आहे.

गोविंद गावडे, कला व संस्कृतीमंत्री

 रंगभूमीचे तपस्वी साधक

विजयकुमार विश्वनाथ नाईक हे गोमंतकीय रंगभूमीचे तपस्वी साधक होते. प्रेक्षकांची नस अचूक पकडत नाटकाचा पडदा पडेपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या नाटकांमध्ये होती. अभ्यास दांडगा होता. मराठी तसेच साहित्याचे त्यांचे वाचन विपुल होते. कलाकारांपासून ते बॅकस्टेजवरचा माणूस, लाइटमन, ड्रायव्हर या सगळ्यांशी ते आपुलकीने वागायचे.

दामू नाईक, सरचिटणीस, भाजप

शिष्य त्यांचा वारसा पुढे नेतील

नामवंत नाट्याकर्मी विजयकुमार नाईक यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आपण शोक व्यक्त करतो. त्यांच्या निधनाने नाट्याक्षेत्रात पोकळी निर्माण झाली असली तरी, विजयकुमार यांच्या ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटरमधून त्यांचे विद्यार्थी आणि शिष्य त्यांचा वारसा पुढे नेतील, याची मला खात्री आहे.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेता

तो एक राजहंस होता

विजयकुमार नाईक हा पूर्णवेळ नाटकातच राहणारा, नाटकच खाणारा, नाटकच पिणारा, नाटकच श्वास त्याचा, गोमंतकीय नाटकाची पताका भारतवर्षात नेणारा, तो एक राजहंसच होता. पण, अचानक रंगमंच सोडून निघून गेला. नाटक अर्ध्यावर टाकून एक्झिट घेतलीय. नाटक आणि हंस दोघांनाही पोरका करून गेला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हिच प्रार्थना.

-रवींद्र आमोणकर, ज्येष्ठ रंगकर्मी, पणजी

‘शो मस्ट गो ऑन’ चा ध्यास

विजयकुमार नाईक यांचा ‘शो मस्ट गो ऑन’ हाच ध्यास होता. कोविड काळात सगळे रंगमंच बंद होते, मात्र विजयकुमार नाईक यांनी बॉक्स थिएटरच्या माध्यमातून नाटक सुरू ठेवले. कुटुंबासह नाटकासाठी काम करणारी गोव्यातील एकमेव व्यक्ती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आज ते आमच्यात नसले तरी त्यांच्या नाट्याकार्यामुळे ते चिरंतर आमच्यात रहातील.

माधुरी शेटकर, रंगकर्मी, मेरशी

प्रायोगिकतेचा ध्यास होता

प्रायोगिक रंगभूमीवर नवेनवे प्रयोग करणे हा त्यांचा ध्यास होता. मिळेल त्या स्पेसचा कलात्मक वापर ते करीत होते. त्यांनी घरातच हंस थिएटरमार्फत युवकांना नाट्या प्रशिक्षण दिले. युवा कलाकार घडविले. स्कूल ऑफ ड्रामातून आमची ओळख झाली होती. यावेळी त्यांनी लेखन, प्रकाश योजना आणि नेपथ्य विभागात आपली चुणूक दाखविली होती. एक अभ्यासू नाट्याकलाकार हरपला आहे.

डॉ. साईश देशपांडे, रंगकर्मी, पणजी

नाटकासाठी अखेरपर्यंत धडपड

विजयकुमार नाईक यांनी अनेक युवा कलाकारांना घडविले. विविध प्रयोग करून नाटक कसे सहज आणि साध्या पद्धतीने करता येते हे त्यांनी दाखविले. पालशेतची विहीर सारख्या नाट्याची निर्मिती करून नाटकातील वेगळेपणही त्यांनी दाखवून दिले. गोव्याबाहेर महाराष्ट्रात त्यांना एक वेगळे स्थान होते. गोव्यात मात्र त्यांना म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही, मात्र त्यांची धडपड अखेरपर्यंत सुरू होती. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

आनंद नाईक, प्रेक्षक

कला अकादमीला शोक

विजयकुमार नाईक यांनी गोमंतकीय प्रायोगिक, उत्सवी व स्पर्धात्मक रंगभूमीला महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. आज ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल गोव्याचे कला व संस्कृतीमंत्री तसेच कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. विजयकुमार नाईक यांचे रंगभूमीवरील कार्य अतुलनिय होते. एक पूर्णवेळ रंगकर्मी म्हणून त्यांनी आपली हयात घालवली. एक प्रज्ञावंत नाटककार, दिग्दर्शक, नट व नाटकासंबंधी तांत्रिक बाजू हाताळण्यातही त्यांचा हातखंडा होता. त्यांचे वडिल तत्कालीन ज्येष्ठ रंगकर्मी कै. विश्वनाथ नाईक यांचा वारसा समर्थपणे दिवंगत विजयकुमार यांनी चालविला होता. कला अकादमीच्या नाट्या विद्यालयातून पदवी संपादन केलेल्या विजयकुमार यांनी आपले संपूर्ण जीवन रंगभूमीसाठी वेचले आहे, असे गोविंद गावडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.