संक्रांतीसाठी रंगीबेरंगी तिळगुळ दाखल
मकर संक्रांत तोंडावर : बाजारात मकर संक्रांतीच्या विविध वस्तू दाखल : तिळगुळ दरात वाढ
बेळगाव : तिळगुळ घ्या गोड बोला, अशा गोड शुभेच्छा देणारी मकर संक्रांत अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात मकर संक्रांतीच्या तयारीसाठी विविध वस्तु दाखल झाल्या आहेत. साखरेच्या किमती वाढल्याने यंदा तिळगुळाच्या किमतीही वाढल्या आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगातील आकर्षक तिळगुळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तिळगुळ, तिळाचे लाडू, साखरेचा हलवा यासह इतर वस्तुंनी बाजारपेठ फुलू लागली आहे. बाजारात भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल पाहावयास मिळत आहे. नवीन वर्षातील पहिला सण उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांची लगबग दिसू लागली आहे. मात्र, यंदा तिळगुळ दरात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
विशेषत: तिळगुळ, तिळाचे लाडू, तीळ भाकरी, गुळ पोळी यासह इतर पदार्थांची आवक दिसून येत आहे. गतवर्षी 45 ते 50 रुपये दर असलेले तिळगुळ यंदा 50 ते 60 रुपये झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना किलोमागे 10 ते 15 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. किरकोळ 10 रुपयेप्रमाणे तिळगुळचे पाकीट विक्री होत आहे. संक्रांतीसाठी बाजारात हलव्याच्या दागिन्यांचे वैशिष्ट्यापूर्ण प्रकार पाहावयास मिळत आहेत. लहान मुलांसाठी डबे आणि तिळगुळही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सोमवार दि. 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात तिळगुळ आणि इतर पदार्थ विक्री होऊ लागले आहेत. पारंपरिक तिळगुळबरोबरच आकर्षक पॅकिंगमध्ये विविध रंगांचे तिळगुळ दाखल झाले आहेत. शिवाय भोगीसाठी शेंगा, हिरवे वाटाणे, सोले आणि इतर भाज्यांचीही तेजी पाहावयास मिळत आहे. शिवाय विविध प्रकारच्या चटण्या आणि भाकरीही दाखल झाल्या आहेत.