For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलंबियाचा ‘टायगर’ होणार राष्ट्रप्रमुख

06:51 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोलंबियाचा ‘टायगर’ होणार राष्ट्रप्रमुख
Advertisement

ट्रम्प यांचे निकटवर्तीय : पेशाने वकील एबेलार्डो दे ला एस्प्रिएला

Advertisement

वृत्तसंस्था/ बोगोटा

कोलंबियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे नेते एबेलार्डो दे ला एस्प्रिएला यांच्या विजयामुळे पूर्ण दक्षिण अमेरिकेतील राजकारण हादरून गेले आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि पेशाने वकील एबेलार्डो यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत डाव्या पक्षांचे उमेदवार इवान सेपेडा यांना मागे टाकत सत्तेचा उंबरठा गाठला आहे. एबेलार्डो यांच्या विजयाकडे कोलंबियाच्या राजकारणात मोठ्या वैचारिक बदलाचे प्रतीक म्हणून पाहिले जातेय.

Advertisement

एबेलार्डो यांना राजकारणात कुठलाच अनुभव राहिलेला नाही. ते पेशाने वकील अन् व्यावसायिक आहेत. तरीही कायदा-सुव्यवस्था, सुरक्षा आणि राष्ट्रवादाला प्रचाराचा मुद्दा करत जनतेचे समर्थन प्राप्त केले आहे. देशात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. मला मतदान न करणाऱ्या लोकांचाही मी अध्यक्ष असेन असे निवडणूक निकालानंतर एबेलार्डो यांनी स्वत:च्या समर्थकांना संबोधित करताना म्हटले आहे. तर वर्तमान अध्यक्ष गुस्तावो पेट्रो आणि त्यांच्या समर्थकांनी प्रारंभिक निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एबेलार्डो दे ला एस्प्रिएला दीर्घकाळापर्यंत वकिली अन् व्यवसायाशी निगडित राहिले आहेत. अनेक हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तिवाद मांडला आहे. त्यांच्या अशीलांमध्ये व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे निकटवर्तीय एलेक्स साब देखील सामील असून त्यांच्यावर अमेरिकेत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. याचबरोबर कोलंबियातील बहुचर्चित उद्योजक डेव्हिड मर्सिया गुजमान यांचा खटला त्यांनी लढविला होता, डेव्हिड यांना देशातील सर्वात मोठ्या आर्थिक गुन्हेगार मानले जाते.

ट्रम्प यांचे निकटवर्तीय

एबेलार्डो यांना निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उघड समर्थन मिळाले. एबेलार्डो हे मजबूत, कठोर आणि कुशाग्र नेते आहेत. एबेलार्डो अवैध स्थलांतर रोखून गुन्हे अन् अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात कारवाई करतील असा दावा ट्रम्प यांनी केला होता. एबेलार्डो हे 2023 पासून अमेरिकेचे नागरिक देखील आहेत. एबेलार्डो यांच्या नेतृत्वात कोलंबियाला अमेरिकेचे पूर्ण समर्थन मिळेल असे ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी म्हटले होते. कोलंबिया पारंपरिक स्वरुपात अमेरिकेचा निकटचा सहकारी राहिला आहे, परंतु अलिकडच्या काळात ट्रम्प आणि गुस्तावो यांच्यादरम्यान स्थलांतर, शुल्क आणि दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेच्या भूमिकेवरून मतभेद राहिले आहेत.

‘टायगर’ का म्हटले जाते?

-एबेलार्डो दे ला एस्प्रिएला स्वत:ला ‘एल टाइग्रे’ म्हणजेच द टायगर म्हणवून घेतात.

- निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ‘टायगर’ला स्वत:ची राजकीय ओळख करून टाकले होते.

-एबेलार्डो हे गुन्हेगारी, ड्रग माफिया, सशस्त्र टोळ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करतील असे समर्थकांचे मानणे आहे.

-या कठोर प्रतिमेमुळेच समर्थक एबेलार्डो यांना ‘टायगर’ नावाने संबोधित असतात.

-प्रचारसभांमध्ये त्यांचे समर्थक कोलंबियाच्या फूटबॉल टीमची पिवळी जर्सी घालून येत होते.

-प्रचारसभांमध्ये ‘मेक कोलंबिया ग्रेट अगेन’ यासारख्या घोषणाही देण्यात येत होत्या.

-सुरक्षेच्या कारणांमुळे एबेलार्डो अनेकदा बुलेटप्रूफ ग्लासमागून भाषण करत होते.

नायिब बुकेलेसोबत तुलना

एबेलार्डो यांची धोरणे आणि राजकीय शैलीची तुलना अनेकदा अल-साल्वाडोरचे अध्यक्ष नायिब बुकेले यांच्याशी केली जाते. त्यांच्या दाढीच्या स्टाइलपासून गुन्ह्यांच्या विरोधात झिरो टॉलरन्सच्या धोरणांपर्यंत अनेक समानता आढळून येतात. ड्रग तस्करांच्या विरोधात मोठी तुरुंगं तयार करण्यात येतील आणि सशस्त्र टोळ्यांच्या विरोधात सैन्य अभियान राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन एबेलार्डो याहंनी दिले आहे.

दक्षिण अमेरिकेत उजव्या विचारसरणीचा प्रभाव

एबेलार्डो यांचा विजय दक्षिण अमेरिकेत उजव्या विचारसरणीच्या उदयाचा हिस्सा आहे. अर्जेंटीनाचे अध्यक्ष जेवियर माइली आणि चिलीचे नेते जोस एंटोनियो कास्ट समवेत अनेक नेत्यांनी त्यांच्या विजयाचे स्वागत पेले आहे. कोलंबियाच्या जनतेने आर्थिक स्वातंत्र्य, समृद्धी आणि सुरक्षेचा मार्ग निवडला असल्याचे उद्गार माइली यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.