घानावर 1-0 ने मात करून कोलंबिया पुढील फेरीत
वृत्तसंस्था, कॅन्सस सिटी, मिसुरी : कोलंबियाने घानावर 1-0 ने विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी रात्री घानाविऊद्धच्या सामन्यात कोलंबियाच्या योजनेत सुऊवातीच्या काही मिनिटांतच खेळाडू बदलण्याची तरतूद निश्चितच नव्हती. पण जेव्हा जॉन कॉर्डोबाच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे दिसले तेव्हा अल्पकाळात खेळाडू बदलण्याचा निर्णय घेण्यास भाग पडून कोलंबियाचे प्रशिक्षक नेस्टर लोरेन्झो यांनी लुईस सुआरेझला मैदानात उतरवले.
सुआरेझने लगेचच एक अचूक क्रॉस’ दिला, ज्यावर जॉन एरियासने चेंडूला हलकासा स्पर्श करून जाळीत पाठवले. अॅरोहेड स्टेडियमवर प्रचंड उकाडा असलेल्या त्या रात्री हा एकमेव गोल ठरला आणि घाना संघावर विजय मिळवून कोलंबियाने विश्वचषकाच्या पुढील फेरीत प्रवेश केला.
56 व्या मिनिटाला कोलंबियाला आपली आघाडी दुप्पट झाल्याचे वाटले होते, यावेळी डियाझने गोल केला, परंतु ‘ऑफसाइड’चा बावटा फडकवण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांतच कोलंबियाच्या या वेगवान आघाडीपटूचा अगदी जवळून मारलेला फटका गोलरक्षक लॉरेन्स अती झिगीने अडवला. घानाचे आव्हान सामन्यात टिकवून ठेवताना झिगीने एकूण सात बचाव केले.
स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वा. सामना सुरू झाला तेव्हा तापमान 31.1 अंश सेल्सिअस होते आणि ‘हीट इंडेक्स’ 96 इतका होता. उन्हाळ्यातील अपेक्षित उष्णतेमुळेच सामना उशिरा सुरू करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला होता. अनेक सामन्यांमध्ये वादग्रस्त ठरलेले हायड्रेशन ब्रेक यावेळी अचानक एक वरदान ठरले, कारण दोन्ही बाजूंचे खेळाडू डिहायड्रेशन आणि पेटके सहन करत झुंज देत होते. अपेक्षेप्रमाणे या सामन्यात कोलंबियाने चेंडूवर वर्चस्व गाजवले. घानाने जेव्हा जेव्हा आक्रमण रचले तेव्हा तेव्हा सुआरेझ, डियाझ आणि त्यांच्या मिडफिल्डर्सच्या वेगाच्या जोरावर कोलंबियाने त्वरित प्रतिहल्ले केले.
सुरुवातीचा गोल कोलंबियाला ठरलाय लाभदायक
सुऊवातीचा गोल हे कोलंबियासाठी एक शुभ लक्षण ठरले आहे. जेव्हा जेव्हा कोलंबियाने पहिला गोल केला आहे, तेव्हा त्यांनी सामना जिंकला आहे. त्यांनी सलग असे 11 विश्वचषक सामने जिंकले आहेत. आता उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी ते मंगळवारा स्वित्झर्लंडविऊद्ध खेळतील.