झारखंडमध्ये ‘जैश’शी संबंधित कॉलेज विद्यार्थिनीला अटक
हनीट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप
वृत्तसंस्था
साहिबगंज
जैश-ए-मोहम्मदचा संशयित दहशतवादी हमीम मंडल याच्या अटकेनंतर पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) झारखंडच्या साहिबगंज जिह्यातील बरहरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 21 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीला अटक केली आहे. साथीदाऱ्याच्या माध्यमातून हनीट्रॅपद्वारे संवेदनशील माहिती गोळा केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. आता तिला पुढील तपासासाठी पश्चिम बंगालमध्ये नेण्यात येणार आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कृती दलाने बरहरवा परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत अर्पिता सरकार हिला अटक केली. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचे नाव अर्पिता सरकार असे असून ती यापूर्वी अटक करण्यात आलेल्या हमीम मंडल याची प्रेयसी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्पिता व्हॉट्सअॅपद्वारे बर्दवानमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी मंडलच्या संपर्कात होती. तपासादरम्यान, एसटीएफला त्या दोघांमधील चॅट्समधून महत्त्वाचे धागेदोरे सापडले.
हनीट्रॅप आणि राजकारण्यांचे जाळे
एका संशयित नेटवर्कने पश्चिम बंगालमधील प्रभावशाली राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह अनेक व्हीआयपींना लक्ष्य करण्याची योजना आखल्याचे एसटीएफच्या तपासात उघड झाले आहे. त्यांनी गोपनीय वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी सापळा रचला होता. या नेटवर्कमध्ये राजकारण्यांशी संपर्क साधणे, त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करणे आणि त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी अर्पिता सरकारचा वापर केला जात होता.
हमीम मंडल आयएसआय-समर्थित नेटवर्कचा भाग
एसटीएफने गुरुवारी बर्दवान शहरातील एका निवासी संकुलातून मोहम्मद हमीम मंडलला अटक केली. तो भाड्याच्या घरात राहत होता. तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय-समर्थित नेटवर्कचा भाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्याच्यावर नेटवर्कसाठी नवीन सदस्यांची भरती करणे, व्हीआयपी नेत्यांची टेहळणी करणे आणि राज्यात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची पूर्वतयारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.