महाविद्यालयीन युवतीवर लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार
सांगली :
लग्नग्नाचे आमिष दाखवून महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित पांडुरंग रावसाहेब शेजूळ (२०, रा. खलाटी, ता. जत) याला मंगळवारी अटक केली आहे. पीडित तरुणी गर्भवती असून पोलिसांनी पांडुरंग शेजूळ याच्याविरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी ही सांगलीनजीकच्या एका शहरातील असून ती शिक्षणाच्या निमित्ताने एका महाविद्यालयात येत होती. सप्टेंबर २०२४च्या दरम्यान संशयित पांडुरंग शेजूळ याने तिच्याशी ओळख करून घेऊन जवळीक वाढवली.
त्यानंतर आपल्या मोपेडवरून फिरून येऊ, असे सांगून कोल्हापूर रोडवरील अंकली गावच्या परिसरात नेले. त्या ठिकाणी त्याने तिला लग्नाचे वचन दिले. त्याच परिसरातील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर १४ जानेवारीपर्यंत संशयिताने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातून आपण गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. पण आपली बदनामी होईल या भीतीने ती गप्प बसली. त्यानंतर मात्र तिने हा प्रकार घरी सांगुन थेट पोलिसांत धाव घेत संशयित पांडुरंग शेजूळ याच्या विरोधात मंगळवारी फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ पांडुरंग शेजूळ याच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.