जिल्हाधिकारी कार्यालय की वाहनतळ?
वाहतूक कोंडी नित्याचीच : वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय आवाराला सध्या वाहनतळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांनिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, जिल्हाधिकारी कार्यालय की वाहनतळ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोकळी जागा असल्याने अनेक वाहनचालक सकाळीच आपली वाहने त्या ठिकाणी पार्क करत आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याचबरोबर इतर कार्यालयांना येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागत आहे. त्याचबरोबर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण
वाहन पार्किंग व्यवस्था मार्गी लागावी यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंग प्रोटेस्ट झोन तयार केला आहे. मात्र, त्या ठिकाणी वाहनचालक वाहने पार्क करण्याऐवजी सिटी सर्व्हे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहने उभी करत आहेत. वाहनतळ व प्रोटेस्ट झोनच्या ठिकाणी पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.
बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाईची गरज
पार्किंग, ज्येष्ठ नागरिकांना झाडाच्या खाली सावलीत बसण्यासाठी आसन व्यवस्था, त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांना प्रोटेस्ट झोन, शुद्ध पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर काँक्रिटचे रस्ते करण्यात आले असून याचा व्यवस्थितरीत्या उपयोग होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयावर दररोज मोठ्या संख्येने मोर्चे, आंदोलने होत असतात. त्यातच बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष घालून बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून पोलिसांना कारवाईचा आदेश देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा मिळणे गरजेचे आहे.
- विजयकुमार होनकेरी (अप्पर जिल्हाधिकारी)