‘जनसुरक्षा’तून अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या'
कोल्हापूर
जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घेऊन विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
भारत सरकारचे वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात झाली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेनंतर्गत मागील कार्यपूर्तीचा आढावा जिल्हाधिकारी येडगे यांनी घेतला. ते म्हणाले, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करा, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा. गरीब, गरजू कुटुंबे, सफाई कामगारांसह सर्व क्षेत्रातील कामगार व प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घ्या. बचत गटातील शंभर टक्के महिलांना या मोहिमेत सामावून घेण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. यापूर्वी मृत्यू झालेल्या खातेधारकांना या योजनांचा लाभ मिळाल्याची खात्री करुन घ्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी त्या त्या विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. तसेच या योजनेचे ऑटो नूतनीकरण 25 ते 31 मे दरम्यान होणार आहे. दोन्ही विमा नूतनीकरणासाठीची 456 रुपये रक्कम बँक खात्यात जमा राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. गावांमध्ये होणाऱ्या शिबिरांपुर्वी गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात व्यापक जनजागृती करावी व वेळापत्रकानुसार शिबिरांचे योग्य नियोजन करावे. बँकांनी आपल्या सर्व खातेदार व कर्जदारांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सर्व खाजगी बँका, ग्रामीण बँका, इंडियन पोस्टल पेमेंट बँक व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यापैकी कोणत्याही बँकेत बचत खाते असल्यास या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो, जिह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे म्हणाले, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत आतापर्यंत 11 लाख 49 हजार 733 तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत 4 लाख 96 हजार 878 बँक खाते धारकांनी सप्टेंबर 2024 अखेर नोंदणी केली आहे. 15 ऑक्टोंबर 2024 पासून 15 जानेवारी 2025 पर्यंत जनसुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. विमाधारक व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या या विमा योजना आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (अपघाती) योजनेचा केवळ 20 रुपये वार्षिक हप्ता असून ही योजना 18 ते 70 वयोगटातील व्यक्तीसाठी आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (नैसर्गिक/अपघाती) योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील व्यक्तीसाठी आहे. केवळ 456 रुपये इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये या दोन्ही विमा सुरक्षा योजनांमध्ये नागरिक सहभागी होऊ शकतात. दोन्ही योजनांमध्ये सहभागी झालेल्या खातेधारकांना अपघाती मृत्यू झाल्यास पात्रतेनुसार या दोन्ही विमा योजनेचा चार लाख रुपयांचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती गणेश गोडसे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे तसेच बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय प्रबंधक विशाल कुमार सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, गटविकास अधिकारी, बँकर्स आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.केला.