खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करणार- जिल्हाधिकारी
पुलाची शिरोली/वार्ताहर
खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करु असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केला. स्मॅक प्रिमियम लीग स्पर्धेत विजयी संघास बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, अध्यक्ष सुरेंन्द्र जैन हे प्रमुख उपस्थितीत होते. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर ( स्मॅक ) प्रिमियम लीगचे मिस्टेअर्स मार्वलसने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी कॅस्प्रो इलेव्हनचा पराभव केला. खासदार धनंजय महाडिक व जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते विजेत्या संघास चषक देण्यात आले.
कोल्हापूरमध्ये चांगले खेळाडू आहेत. त्याप्रमाणात खेळाडूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये कोल्हापूरच्या उद्योजकांनी आपला हातभार लावला असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरातील उद्योजक जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर आपला सीएसआर निधी खर्च करत आहेत. त्याऐवजी सुपर हंड्रेड कोल्हापूर अशी समिती स्थापन करुन एक मोठा निधी जमा होईल. त्या निधीमध्ये खासदार म्हणून माझाही तेवढाच निधी असेल. या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील खेळाडूं आणि कलाकारांना आर्थिक मदत करत प्रोत्साहन देता येईल. हा एक देशात नविन आदर्श निर्माण होईल असे त्यांनी सुचविले.
कोल्हापूर येथील शास्त्री नगर क्रिकेट मैदानावर तीन दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकुण ३१ सामने झाले. अंतिम सामन्यात कॅस्प्रो इलेवनने पाच बाद एकोणसाठ धावा केल्या. कॅस्प्रो इलेवनचे जिगर राठोड यांनी आक्रमक फलंदाजी करत पंधरा चेंडूत तीस धावा केल्या. पण मिस्टेअर्स मार्वलसचे फलंदाज आसिफ शेख यांनी सहाव्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर षटकार लगावत अंजिक्यपदावर शिक्का मोर्तब केले. मिस्टेअर्स मार्वलसने एक बाद त्रेसष्ट धावा केल्या.
अंतिम सामन्यापूर्वी झंवर ग्रुप चॅम्पियन्स विरुद्ध मिस्टेअर्स मार्वलस यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात झंवर चॅम्पियन्सचा पाच धावांनी पराभव करत मिस्टेअर्स मार्वलसने अंतिम सामन्यात प्रवेश केला. कॅस्प्रो इलेवन विरुद्ध यश टायगर्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. कॅस्प्रो इलेवनने यश टायगर्सवर एकवीस धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
स्मॅक प्रिमियम लीग स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी झाले होते. उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने चार संघाचे चार ग्रुप करण्यात आले होते. आठ षटकांच्या या सर्व सामन्याचे यू ट्यूबवर थेट प्रक्षेपण होते.
स्मॅकचे अध्यक्ष सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप चौगुले आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक सोनी, अभिषेक झंवर, साहिल मोमीन, कुणाल कट्टी, श्रीराम सुरवसे, प्रेम शिंदे, ओंकार भगत व हर्ष राठोड यांनी या स्पर्धांचे आयोजन केले.
अंतिम सामन्यासाठी जेष्ठ उद्योजक चंद्रशेखर डोली, स्मॅक उपाध्यक्ष जयदीप चौगुले, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजू पाटील, मॅकचे हरीषचंद्र धोत्रे, स्मॅक सचिव भरत जाधव, संचालक निरज झंवर, रणजित जाधव, बदाम पाटील, शेखर कुसाळे, उद्योजक प्रकाश राठोड, रवी डोली, संजय भगत आदी उपस्थित होते.