अन्न सुरक्षा विभागाकडून शहरातील मांसाहारी पदार्थांचे नमुने संग्रहित
प्रयोगशाळेत पाठवून दर्जा तपासण्याची मोहीम
बेळगाव : अन्न सुरक्षा विभागाकडून बेळगावसह संपूर्ण राज्यात मांसाहारी खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत मांसाचे नमुने संग्रहित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांच्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम सुरू झाली असून रविवारी 16 मांसाचे नमुने संग्रहित करण्यात आले आहेत. मटणचे 6, चिकनचे 8, अंड्यांचे 2 नमुने संग्रहित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
राज्य अन्न सुरक्षा व गुणवत्ता विभागाच्या सूचनेवरून हा उपक्रम हाती घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेवरून मांस विक्री केंद्रांवर मांसाचे नमुने संग्रहित करण्यात येत आहेत. मटण, चिकन व अंडी तपासणीसाठी नमुने कसे संग्रहित करावेत, याची सूचना अन्न सुरक्षा विभागाकडून करण्यात आली असून या मार्गसूचीनुसार नमुने संग्रहित करण्यात येत आहेत. 50 टक्के मांसाचे नमुने संघटित विभागातून तर उर्वरित 50 टक्के नमुने असंघटित विभागातून जमविण्याची सूचना केली आहे. दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. बकरी, शेळी, कोंबडी व अंड्यांचे प्रत्येकी अर्धा किलो नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.